नाशिक। दि. ५ सप्टेंबर २०२६: निवृत्तीवेतनाशी संबंधित सेवा जलद, पारदर्शक आणि सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने महा- उपलब्धी (Maha- UPLABDHI) हे अधिकृत मोबाईल ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या त्यांच्या मासिक, वार्षिक निवृत्तीवेतनाचा तपशील, उत्पन्नाचा दाखला, फॉर्म क्रमांक १६, निवृत्तीवेतनविषयक शासन निर्णय आदी पीडीएफ स्वरुपात उपलब्ध होणार आहेत.
या ॲपच्या वापराबाबत गुरुवार १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. वरीष्ठ कोशागार अधिकारी सचिन धस यांनी ही माहिती दिली आहे.
कार्यशाळेला येताना जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी आपला पीपीओ क्रमांक, बँक खाते क्रमांक, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि स्मार्ट फोन सोबत आणावा. या कार्यशाळेस संबंधितांनी उपस्थित राहावे, असेही आवाहन वरीष्ठ कोशागार अधिकारी श्री. धस यांनी केले आहे.
![]()


