नाशिक: सख्या साडूनेच केला साडूचा धारदार कुऱ्हाडीने खून; दोघी बहिणींनाही केले गंभीर जखमी

नाशिक (प्रतिनिधी): येथून जवळच असलेल्या सुर्यगड येथील माजी सरपंच मनोहर राऊत (४५) यांची हत्या त्यांच्याच साडूने केल्याची घटना आज पहाटे साडेचार वाजेच्या दरम्यान घडली आहे. तर मयत राऊत यांची पत्नी आणि आरोपीची पत्नी या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत.

याबाबत मयताची मुलगी रोशनी राऊत हिने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यात म्हटले आहे की, माझे काका संशयित आरोपी भास्कर परशराम पवार रा. पायरपाडा पळसन यांचे सर्वच कुटुंब हल्ली मुक्काम सुर्यगड हे नातेवाईक असल्याने व त्यांना त्यांचा चुलता हिरामण पवार हा त्रास देत असल्याने ते माझ्या वडिलांकडेच सहा महिन्यांपासून राहत होते.

माझे हातरुंडी येथील मामा प्रकाश महाले यांनी सांगितले, की आता त्यांना मुळ गावी पायरपाडा येथे पाठवून द्या. तोच निरोप माझ्या वडिलांनी काका व मावशी यांना सांगितले की तुम्ही आता तुमच्या गावी निघून जा.

याचा राग आल्याने तोच राग मनात धरून पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास काकांनी माझ्या वडिलांच्या उजव्या खांद्याच्या माने जवळ, हनुवटी व छातीवर वार केले होते. तर आई व मावशीच्या हातावर कुऱ्हाडीने वार करून जखमी केले.

वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. जमिनीवर सर्वत्र रक्त सांडले होते. मावश भाऊ सुरेश पवार यांने वडील भास्कर पवार यास पकडून ठेवले होते. त्यांच्या हातात कुऱ्हाड होती, असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिल आहेर हे पुढील तपास करीत आहेत.

पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असून पुढील तपास करीत आहेत. पोलीस उप अधीक्षक नितीन कुमार गोकावे यांनी सुर्यगड येथील घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली.

यापैकी मयत मनोहर राऊत यांची पत्नी भारती राऊत यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. यावेळी रूग्णालयात मोठी गर्दी झाली होती. राऊत यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील असा परिवार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790