इगतपुरीत विपश्यनेसाठी आलेला तरुण ५ दिवसांनी गायब; कृत्रिम तळ्यात सापडला मृतदेह

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): इगतपुरी येथील विपश्यना विश्व विद्यापीठात विपश्यनेसाठी आलेल्या अमोल देविदास गंगावणे (वय: ३७, रा. पाण्याच्या टाकीजवळ, शिक्षक कॉलनी, सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर) तरुणाचा मृतदेह विपश्यना परिसरातील डोंगर पायथ्यापाशी असलेल्या महावन तेथील कृत्रिम तळ्यात आढळला.

दहा दिवसांसाठी असलेल्या शिबिरात साधना करण्यासाठी हा तरुण २७ सप्टेंबर रोजी साधक म्हणून पहिल्यांदाच दाखल झाला होता. परंतु, पाचच दिवसात तो अचानक राहत्या खोलीतून गायब झाला.

तरुण सापडत नसल्याने १ तारखेला त्याचा सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोध घेतला. त्यात तो धम्मगिरीच्या बाहेर जातांना दिसून आला नाही. दरम्यान व्यवस्थापनाने संपूर्ण धम्मगिरी परिसरात शोध घेऊनही तो न आढळून आल्याने त्याच्या घरच्यांना कळविण्यात आले.

घरी परतला नसल्याने त्याचा शोध सुरु ठेवण्यात आला. अखेरीस मंगळवारी त्याचा मृतदेह तलावात तरंगतांना आढळला. विपश्यना विद्यापीठाचे व्यवस्थापक गोविंद वाणी यांनी इगतपुरी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस निरीक्षक सुर्वे आणि त्यांच्या पथकाने चौकशी करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790