नाशिक (प्रतिनिधी): सोसायटीच्या पार्किंगमध्ये लोखंडी ग्रील बसविण्यावरून वाद झाला असता, संशयितांनी गंभीर मारहाण केल्याप्रकरणी दोघा आरोपींना सात वर्षे कारावास आणि ५० हजारांचा दंड ठोठावला आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये सदरची घटना घडली आहे.
हर्षल बिपिनचंद नंदू (४८), तुषार बिपिनचंद नंदू (४२, रा. प्रिन्स पॅलेस सोसायटी, इंद्रकुंड) असे दोघा आरोपींची नावे आहेत. मनिष नंदलाल लढ्ढा (४७) यांच्या फिर्यादीनुसार, सोसायटीच्या सामाईक पार्किंगमध्ये आरोपी लोखंडी ग्रील बसवित होते. त्यावेळी लढ्ढा यांनी सोसायटीची परवानगी घेतल्यानंतर काम करण्याचे समजावून सांगितले. त्यावेळी आरोपींना राग येऊन त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यात मारले. तसेच, आरोपी तुषार याने कानशिलात मारले होते. यात लढ्ढा यांचा कानाला इजा गंभीर इजा पोहोचून कायमचा निकामी झाला. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल होता.
या गुन्ह्याचा तपास हवालदार मलंग गुंजाळ यांनी करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदरचा खटला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती प्रतिभा पाटील यांच्यासमोर चालला. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता श्रीमती सुनिता चितळकर यांनी कामकाज पाहताना ८ साक्षीदार तपासले.यात आरोपी दोषी आढळून आल्याने न्यायालयाने दोघांना ७ वर्षे कारावासाची शिक्षा आणि प्रत्येकी २५ हजारांचा दंड ठोठावला. तसेच दंडातील ४५ हजारांची रक्कम पीडित लढ्ढा यांना देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार एम.ए. खंबाईत, महिला अंमलदार पी.पी. गोसावी यांनी पाठपुरावा केला.
![]()


