नाशिक: आदर्श आचारसंहितेची कडक अंमलजावणी करण्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे स्पष्ट निर्देश

नाशिक (जिल्हा माहिती कार्यालय): भारत निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने आजपासूनच (मंगळवार) जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणांनी त्याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज दिले.

राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकारी शर्मा यांनी आज जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणांच्या प्रमुखांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, उपजिल्हाधिकारी (प्रशासन) तुकाराम हुलावळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात दुपारी ३ वाजेपर्यंत झाले 'इतके' टक्के मतदान…

जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले की, सर्व शासकीय यंत्रणांनी त्यांच्या कार्यालय आणि कार्यालयाच्या परिसरात असलेले विविध योजनांचे फलक तात्काळ काढून टाकण्यास सुरुवात करावी. याशिवाय, रस्ते, सार्वजनिक परिसर याठिकाणी असणारे विविध फलक, बॅनर्स, होर्डिंग्ज वरील मजकूर हटविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

हे ही वाचा:  नाशिक: एसटी व ट्रकचा अपघात; दोन्ही चालक ठार; २ जण गंभीर जखमी

निवडणूक एकाच टप्प्यात होणार असल्याने सर्व यंत्रणांनी दक्ष राहावे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक यंत्रणेची परवानगी घेतल्याशिवाय अधिकारी आणि कर्मचारी यांना रजा मंजूर करू नये, असे निर्देशही त्यांनी दिले.

निवडणूक निष्पक्ष आणि खुल्या वातावरणात होईल, यासाठी आचारसंहितेची कडक अंमलबजावणी केली जाईल. याबाबत विभाग प्रमुखांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुस्पष्ट सूचना द्याव्यात. कोणत्याही परिस्थितीत आचारसंहिता अंमलबजावणी मध्ये हयगय चालणार नाही, असे त्यांनी बजावले.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात सकाळी ७ ते ११ दरम्यान झाले इतके टक्के मतदान…

यावेळी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मंगरुळे यांनी, जिल्ह्यात तत्काळ भरारी पथक नेमण्यात येणार असून आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

यावेळी, महसूल, पोलिस, सार्वजनिक बांधकाम, महापालिका यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790