
नाशिक (प्रतिनिधी): महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंतर्गत स्थापित महिला बचत गट नव तेजस्विनी महोत्सव 2025 प्रदर्शनाच्या प्रचार प्रसिद्धी वाहनास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.
याप्रसंगी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सुनील दुसाणे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय गायकवाड, लेखाधिकारी नितीन खोडके, कार्यक्रम अधिकारी युवराज ऊखाडे, जिल्हा प्रकल्प सल्लागार राजेश धनाड, एम.आय.एस सल्लागार निलेश थोरात, स्त्री शक्ती सी.एम.आर.सी व्यवस्थापक पुंजाराम बच्छाव यांच्यासह सहयोगिनी व बचत गटातील महिला उपस्थित होत्या.
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या वतीने मातोश्री कृषी पर्यटन केंद्र, दिंडोरी येथे 15 ते 17 मार्च 2025 या तीन दिवसीय नव तेजस्विनी महोत्सव 2025 प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनात बचतगटाने तयार केलेले खाद्यपदार्थ, तृणधान्य, शोभेच्या वस्तू, लाकडी खेळणी, बांबू पासून तयार केलेल्या शोभेच्या वस्तू, रेडीमेड गारमेंट साडी व ड्रेस, औषधी तेल, भेटवस्तू, इमिटेशन ज्वेलरी, कडधान्य व शेतमाल उत्पादने ठेवण्यात येणार असून नागरिकांना या प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी श्री. गायकवाड यांनी केले आहे.