नाशिक (प्रतिनिधी): शेतात फेरफटक्यासाठी गेलेल्या साठीतील आजोबांच्या पाठीमागे ८ वर्षाची संस्कृती आव्हाड आणि ६ वर्षांची आरोही आव्हाड या दोघी बहिणी ५० फूट अंतरावर एकामागे एक चालत होत्या.
तेवढ्यात मक्याच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने संस्कृतीची मानगुटच आपल्या जबड्यात पकडली व तिने जोराचा टाहो फोडला. आरोहीही जोरात ओरडली. आजोबांबरोबरच शंभर फुटावर असलेल्या चुलत्याने बिबट्याकडे जोरात धाव घेत जोरजोऱ्यात आरडा ओरडा केला.
त्यामुळे गांगरलेल्या बिबट्याने संस्कृतीची मानगुट सोडून जोराची धूम ठोकली व संस्कृतीचा जीव वाचला. ही घटना तालुक्यातील दापूर येथील गोंदनई मळ्यात घडली.
माहितीनुसार, सोमनाथ देवराम आव्हाड (६०) हे रविवारी सकाळी ८ वाजता घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतात गेले होते. त्यांचा मुलगा किरण आव्हाड पिकाला पाणी देत होता. आजोबा शेतात गेल्याचे बघून किरण यांची मुलगी संस्कृती आणि आरोही या दोघीही पाठोपाठ शेतात गेल्या. याचवेळी बिबट्याने संस्कृतीवर हल्ला चढवला. आजोबांबरोबरच मुलींचा चुलता परसराम आव्हाड यांनी संस्कृतीच्या दिशेने धावल्याने तिचा जीव वाचला.
संस्कृतीवर झाली शस्त्रक्रिया:
संस्कृतीला तातडीने प्राथमिक उपचारासाठी पहिल्यांदा सिन्नरला आणि तेथून नाशिक येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मानेवर पुढच्या बाजूने दोन, मागच्या बाजूने एक दात लागल्याने खोलवर जखम झाली होती. शिवाय तिच्या डाव्या बाजूने ओठही फाटला. पाठीमागून पंजाने पायालाही ओरखडा उमटला. मानेच्या शिरापर्यंत खोलवर गेलेल्या जखमेमुळे संस्कृतीवर अवघड शस्त्रक्रिया पार पडली. घटनेनंतर वनविभाग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. परिसरात तातडीने पिंजरा जाऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.