नाशिक (प्रतिनिधी): वीज वितरण कंपनीतून बोलत असल्याचे सांगून वीज बिल अपडेट करण्यासाठी लिंक डाउनलोड करण्यास सांगून बँक खात्यातून ८० हजारांची रक्कम काढून घेत फसवणूक केली.
काठेगल्ली येथे हा प्रकार उघडकीस आला. याबाबत भद्रकाली पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि सतीश एकलहरे (रा. काठे गल्ली, द्वारका) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अनोळखी मोबाइलनंबरहून फोन आला. वीज वितरण महामंडळातून बोलत असल्याचे सांगितले.
तुमचे वीजबिल भरलेले आहे का, असे विचारले. एकलहरे यांनी बिल भरल्याचे सांगितले. संशयिताने वीज वितरणाच्या सिस्टिममध्ये तुम्ही भरलेले बिल दिसत नसल्याने एक डेस्क लिंक पाठवतो, त्यावर सर्व माहिती भरा, असे सांगत मोबाइलवर लिंक पाठवली.
एकलहरे यांनी लिंक ओपन केली. त्यावर माहिती भरली असता काही वेळात त्यांच्या बँक खात्यातून ऑनलाइन ८० हजारांची रक्कम काढून घेण्यात आली. वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.