
नाशिक। दि. २५ फेब्रुवारी २०२६: महानगरपालिका आयुक्तांच्या बनावट सहीचे नियुक्तीपत्र तयार करून नोकरीचे आमिष दाखवत लाखोंची फसवणूक करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा अंबड युनिटने धुळे येथे सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली. सहा महिन्यांपासून फरार असलेला हा आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
सातपूर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यानुसार, फिर्यादी निलेश नामदेव तुपलोंढे (वय ५०, रा. गंगापूर शिवार, नाशिक) यांनी तक्रार दिली होती की, जानेवारी २०२५ ते ३१ मे २०२५ दरम्यान जालिंदरनाथ अशोक मोरे (वय ३२, रा. धुळे) याने त्यांच्या मुलीला धुळे महानगरपालिकेत शिपाई पदावर नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी आरोपीने आरटीजीएस, फोनपे आणि रोख स्वरूपात वेळोवेळी एकूण ६ लाख १५ हजार ७०० रुपये स्वीकारले.
फिर्यादीच्या मुलीची नोकरी लागल्याचा भास निर्माण करण्यासाठी आरोपीने धुळे महानगरपालिका आयुक्तांच्या बनावट सहीचे नियुक्तीपत्रही दिले. मात्र प्रत्यक्षात कोणतीही नियुक्ती न झाल्याचे उघड झाल्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार समोर आला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४६/२०२५ अन्वये भा.न्या.सं. कलम ३१८ (४), ३३६ (२), ३३६ (३), ३३८, ३ (५) अंतर्गत १३ ऑगस्ट २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीने मोबाईलचा वापर बंद करून सहा महिन्यांपासून पोलिसांना चकवा दिला होता. दरम्यान, गुन्हे शाखा अंबड युनिटचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना आरोपी धुळे येथे असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने २४ फेब्रुवारी २०२६ रोजी धुळे येथे शोधमोहीम राबवली.
गुन्हे शाखा अंबड युनिटचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, हवालदार: प्रकाश बोडके, भुषण सोनवणे व अंमलदार चारूदत्त निकम असे धुळे येथे जावुन आरोपीचा शोध घेत असतांना आरोपीस पोलीस आल्याची चाहुल लागताच त्याने तेथुन पळ काढला.
पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने टँकरच्या केबिनमध्ये बसून पळ काढल्याची माहिती मिळताच पथकाने तत्काळ पाठलाग सुरू केला. १२ फूटी हनुमान मंदिर, गुरुद्वारा परिसर, ब्रिजखाली (जि. धुळे) येथे पोलिसांनी टँकरसमोर वाहन आडवे लावून चारही बाजूंनी घेराव घालत आरोपीला ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेला जालिंदरनाथ अशोक मोरे हा संबंधित गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून त्याला पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
गुन्हे शाखा अंबड युनिटच्या या कारवाईमुळे बनावट नियुक्तीपत्राद्वारे नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
![]()

