नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): खिरमाणी (ता. बागलाण) येथील विवाहितेला नवीन शेतजमीन खरेदीसाठी पैसे न आणल्याचा राग मनात धरून तिच्या पतीनेच विहिरीत ढकलल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी (ता.१३) घडली. याबाबत जायखेडा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. फोपीर (ता. बागलाण) येथील माहेरवाशीण असलेल्या योगिता ऊर्फ अंजनाबाई देविदास भदाणे (वय ३५) असे दुर्दैवी मृत महिलेचे नाव आहे.
गेल्या काही दिवसांपासून शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या या दाम्पत्यातील वाद विकोपाला गेल्याने पती देविदास महादू भदाणे याने पत्नीला शेतातील विहिरीत ढकलून खून केल्याने सर्वत्र खळबळ उडाली. आरोपी पती देविदास महादू भदाणे, सासरे महादू दगा भदाणे, दिर प्रवीण महादू भदाणे, दिराणी पूनम प्रवीण भदाणे, सासू सगुणाबाई व जिजाबाई महादू भदाणे, (सर्व राहणार खिरमाणी) यांच्यावर जायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून मालेगाव येथील उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, जायखेड्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ, उपनिरीक्षक संजय वाघमारे, एस. एस. चेडे तातडीने घटनास्थळी हजर झाले. शवविच्छेदन येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र पाटील, डॉ. दीप्ती चौधरी यांनी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. मृत योगिता यांच्या पश्चात एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ हे करीत आहेत.
दंगा नियंत्रण पथक तैनात:
रात्री उशिरापर्यंत मृत विवाहितेच्या माहेरची, सासरची मंडळी मोठ्या संख्येने येथील ग्रामीण रुग्णालयात जमा झाली होती. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी मालेगाव येथील दंगा नियंत्रण पथकाच्या ३० कर्मचाऱ्यांची तुकडी ग्रामीण रुग्णालयाचा परिसरात तैनात होती. स्वार्थासाठी पत्नीचा जीव घेणाऱ्या गुन्हेगारास कठोर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाइकांनी केली आहे.