नाशिक: व्यापाऱ्याच्या अपहरणातील मुख्य सूत्रधाराला शिर्डीतून अटक! विशेष पथकाची कामगिरी

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): गेल्या मार्च महिन्यात म्हसरुळ हद्दीतून व्यापारी अपहरण प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह एकाला शिर्डीतून शिताफीने अटक करण्यात आली आहे. याच व्यापाऱ्याकडे तो कामाला होता. त्यामुळे अपहरणात तो प्रत्यक्ष सामील झाला नाही, मात्र त्यानेच अपहरणाचा कट रचून तो अंमलात आणल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले होते. मात्र गुन्हा घडल्यापासून तो पसार होता. सदरची कामगिरी शहर गुन्हेशाखेच्या विशेष पथकाने बजावली आहे.

राजेशकुमार गुप्ता (रा. म्हसरुळ) यांचे ४ मार्च २०२४ रोजी म्हसरुळ हद्दीतील सुयोजित गार्डन येथून संशयितांनी अपहरण केले होते. याप्रकरणी संशयितांनी १२ लाखांची खंडणी वसुल केल्यानंतर गुप्ता यांना देवास येथे सोडून दिले होते. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल आहे. दरम्यान, या गुन्ह्यात शहर गुन्हेशाखेने यापूर्वीच तिघांना अटक केलेली आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: गंभीर गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या संशयिताला बेड्या !

परंतु या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार मात्र पोलिसांच्या हाती लागलेला नव्हता. विशेष शाखेचे उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, अंमलदार भगवान जाधव, भूषण सोनवणे हे गस्तीवर असताना त्यांना सदरच्या गुन्ह्यातील दोन संशयित शिर्डीत आले असल्याची खबर मिळाली होती. याची माहिती गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त संदीप मिटके यांना दिली. यानंतर मिटके यांच्यासह पथकाने शिर्डी गाठली आणि संशयितांचा शोध सुरू केला.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: भरधाव मोटारसायकलच्या धडकेत २४ वर्षीय युवतीचा मृत्यू

त्यावेळी संशयित हे पालखी रोडवरील हॉटेल साई संजय येथे संशयित थांबल्याची माहिती मिळाली. शिर्डी पोलिसांच्या मदतीने शहर विशेष शाखेने संशयित शिवा रवींद्र नेहरकर (२३, रा. नंदनवन चौक, उत्तमनगर, सिडको), शूभम नानासाहेब खरात (२५, रा. संतोषी मातानगर, सातपूर) यांना ताब्यात घेत चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. संशयितांना तपासाकामी म्हसरुळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

सदरची कामगिरी आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त संदीप मिटके, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, दिलीप भोई, किशोर रोकडे, दत्ता चकोर, रवींद्र दिघे, भूषण सोनवणे, भगवान जाधव, अनिरुद्ध येवले यांच्या पथकाने बजावली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: प्रेयसीच्या पतीचा खून करून फरार झालेल्या प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक !

व्यापारी गुप्ता यांच्या अपहरण व खंडणी गुन्ह्यात मुख्य सूत्रधार शिवा नेहरकर आहे. तो गुप्ता यांच्याकडे कामाला असल्यास त्यास गुप्ताची आर्थिक स्थिती माहिती होती. तसेच, गुप्ता व त्याची पत्नी त्याला ओळखत होते. त्यामुळे त्याने या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग न घेता कट रचला आणि तो अंमलात आणला.त्यासाठी त्याने फोनवरून संशयितांना अपहरणापासून ते खंडणी उकळेपर्यंत व गुप्ताची सुटका करेपर्यंतच्या सूचना देत होता. उकळलेल्या खंडणीच्याच रकमेतून त्याने शेवरलेट कार खरेदी केली होती. पोलिसांनी ती त्याचवेळी जप्त केली आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here