नाशिक (प्रतिनिधी): गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवरजवळील भाजीबाजार चौकात चोरट्यांनी महिलेच्या गळ्याची सोन्याची चैन ओरबडली होती. १७ ऑक्टोबर २०२१ ला रात्री आठच्या सुमारास झालेल्या घटनेतील आरोपीसह चैन खरेदी करणाऱ्या दोघी सराफांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. १६) तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. दंगल ऊर्फ उमेश अशोक पाटील (वय २८, रा. जय भवानी रोड, नाशिक रोड) असे चैन ओरबडणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
मुकुंद गोविंद बागूल (रा. विवेकानंदनगर, सिडको) आणि मुकुंद दयानकर (रा. सराफ बाजार) अशी शिक्षा ठोठावलेल्या सराफांची नावे आहेत. स्नॅचिंगच्या या घटनेत १७ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरट्याने ओरबडली होती.
सौ. राधिका कुटे (रा.गंगापुर रोड) यांनी याप्रकरणी गंगापुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. स्नॅचिंगच्या या घटनेतील आरोपी उमेशला पोलिसांनी २१ ऑक्टोबर २०२१ ला सापळा रचून अटक केली होती. त्याने चोरी केलेला माल बागुल व दयानकर यांना विकल्याची कबुली तपासादरम्यान दिली. यानंतर दोघा सराफांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक एस. एस. भिसे यांनी सबळ पुरावे गोळा करत गुन्हा शाबीत होण्यासाठी मेहनत घेतली.
आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.बुधवारी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आर. आर. खान यांनी गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध परिस्थितीजन्य पुराव्यांना अनुसरुन शिक्षा सुनावली आहे. त्यानुसार स्नॅचरला दोन्ही सराफांना तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून अनिकेतन आव्हाड व प्रमिला जाधव यांनी काम पाहिले. कोर्ट अंमलदार पोलिस कॉन्सटेबल बी. आर. कापडणीस, यांनी शिक्षा लागण्याच्या दृष्टीने पाठपुरावा केला.