नाशिक (प्रतिनिधी): पंचवटी पोलिसांकडून एका गुन्ह्यात अटक झाल्यानंतर जामीन मिळावा यासाठी जिल्हा न्यायालयात चक्क एका मयत इसमाच्या नावाने बनावट कागदपत्रे सादर करत तोतया जामीनदार उभा करून न्यायालयाची दिशाभूल केल्याचा धक्कादायक प्रकार १५ डिसेंबर २०२० साली घडला होता.
याप्रकरणी न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यात अंतिम सुनावणी होऊन मुख्य न्यायदंडाधिकारी एस. जी. बावकर यांनी आरोपी मयूर राजेंद्र हिरावत (२५, रा. दत्तनगर, पेठरोड) यास सात वर्षांची सक्तमजुरी व सात हजारांचा दंड, अशी शिक्षा ठोठावली.
सरकारवाडा पोलिस ठाणे हद्दीतील सहदिवाणी न्यायाधीश व स्तर अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात २०२० साली हा गुन्हा घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी संशयित मयूर यास अटक करून न्यायालयात हजर केले होते. यावेळी जामीन मिळविण्यासाठी संशयिताने गणपत भिका जाधव (रा. गंगापूर गाव) हे २०१४ साली मयत झालेले असताना सुद्धा त्यांच्या नावाने जमिनीचा सातबारा उतारा, आधार कार्ड न्यायालयात सादर केले. तसेच एका अनोळखी इसमाला पुढे करत हेच जाधव असल्याचे न्यायालयाला भासवून जामीन मिळविला. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा सखोल तपास तत्कालीन सहायक निरीक्षक नितीन खैरनार यांनी करत सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याच्या अंतिम सुनावणीवेळी सरकारी पक्षाकडून मंगळवारी (दि. २६) सहायक सरकारी अभियोक्ता विद्या देवरे-निकम यांनी युक्तिवाद केला. यावेळी देवरे-निकम यांनी एकूण आठ साक्षीदार न्यायालयापुढे तपासले. त्यांनी दिलेल्या साक्षी नोंदवून सादर करण्यात आलेल्या पुराव्यांअधारे न्यायालयाने मयूर यास दोषी धरले. त्यास या गुन्ह्यात सात वर्षांचा सश्रम कारावास व सात हजारांचा दंड, अशी शिक्षा सुनावली.