नाशिक (प्रतिनिधी): अल्पवयीन पीडितेशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा व १० हजारांचा दंड ठोठावला आहे. मे २०२१ मध्ये ही घटना घडली होती. नाशिक रोड पोलिसात पॉक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल होता. रुझान समीर पठाण (रा. जुना ओढा रोड, नाशिक रोड) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.
पीडित १४ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीनुसार, आरोपी पठाण याने पीडितेशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. त्याचे सहकारी देवरे व कोमरे (रा. नाशिक रोड) यांनी नाशिक रोडच्या हॅपी गेस्ट हाऊस येथे २७ मे २०२१ रोजी दुपारी रुम घेऊन दिली. याठिकाणी आरोपी पठाण याने अल्पवयीन पीडितेवर तिच्या मनाविरुद्ध अत्याचार केले होते. याप्रकरणी नाशिक रोड पोलिसात पॉक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता.
तत्कालीन उपनिरीक्षक लियाकत पठाण यांनी गुन्ह्याचा तपास करीत आरोपीविरोधात दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात दाखल केले होते. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश व्ही. एस. मलकापट्टे-रेड्डी यांच्यासमोर खटल्याची सुनावणी होऊन आरोपी पठाणविरोधात आरोप सिद्ध झाल्याने त्यास २० वर्षे साधा कारावास व १० हजारांचा दंड ठोठावला.
तर, पुराव्याअभावी देवरे, कोमरे यांची निर्दोष मुक्तता केली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सुलभा सांगळे यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून अंमलदार धनश्री हासे, सहायक उपनिरीक्षक दिनकर खैरनार यांनी पाठपुरावा केला.