नाशिकच्या कॉलेजरोडला रायडींगचा ब’ळी: 65 वर्षीय आजीला बाईकरने उडवले; उपचारादरम्यान मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील कॉलेज रोड परिसरात ७ मे रोजी एका 65 वर्षीय महिलेला मोटरसायकल स्वाराने उडविल्याची घटना घडली होती.
या आजीचा आज (शुक्रवार, दिनांक 13 मे रोजी) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
मृ’त महिलेचे नाव तारा शांताराम कुलकर्णी आहे.
या घटनेचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, तारा शांताराम कुलकर्णी (वय 65 वर्ष, राहणार: सिद्धिविनायक नगर, त्रिकोणी बंगला, अमृतधाम, तारवाला नगर, पंचवटी) ह्या शनिवार दि. 7 मे रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास काही कामानिमित्त कॉलेज रोड येथे आल्या होत्या.
कॉलेज रोड परिसरातील डेअरी डॉन या दुकानासमोरून त्या जात असताना एका अज्ञात मोटार सायकलस्वाराने ठोस दिली. यात ह्या 65 वर्षीय आजी गं’भीर जखमी झाल्या होत्या. या अपघातात त्यांच्या हाता पायाला आणि डोक्याला गंभीर इजा झाली होती. मोटारसायकलस्वार मात्र कोणतीही मदत किंवा पोलिसांना खबर न देता पळून गेला. सामाजिक कार्यकर्ते भूषण शिरसाठ यांनी ह्या महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. सुरवातीला महिलेची ओळख होत नव्हती.
मात्र दोन जणांच्या मदतीने महिलेच्या घरच्यांना माहिती दिल्यानंतर सदर महिलेची ओळख पटली. मात्र शुक्रवार (दि. 13मे) रोजी ह्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कॉलेजरोडला युवकांची रायडिंग ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याला पोलिसांनी अटकाव करावा अशी मागणी होत आहे. त्याचप्रमाणे या गुन्ह्यातील आरोपीस तत्काळ अटक करण्याची मागणी नातेवाईकांना कडून करण्यात आली आहे. गंगापूर पोलीस आरोपीचा शोध घेत घेत आहेत.