नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): जलवाहिनी जोडणी, गळती थांबविणे, पाणी पुरवठा वितरण प्रणालीतील दुरुस्ती कामे आणि विशिष्ट वीज उपकेंद्रातील कामांसाठी वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याने शनिवारी (दि. १३) संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा खंडीत केला जाणार आहे. रविवारीही (दि. १४) सकाळी शहरात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरात पाणी पुरवठा विभागातील विविध ठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिन्या तसेच उपवितरण वाहिन्यांची दुरुस्ती तसेच व्हॉल्वची दुरुस्ती, व्हॉल बदलणे तसेच देखभाल दुरुस्तीची कामे यासह गंगापूर धरण पंपीग स्टेशन येथील स्वीच यार्ड चेंज ओव्हर स्ट्रक्चरची कामे करण्यता येणार आहे. त्यामुळे गंगापूर धरण पंपिंग स्टेशन व मुकणे पंपिंग स्टेशन येथील पंपिंग बंद ठेवावे लागणार आहे.
परिणामी संपूर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा शनिवार (दि.१३) सकाळी ९ वाजेपासून पूर्ण दिवस होऊ शकणार नाही. तसेच रविवार (दि. १४) सकाळचा संपुर्ण महापालिका क्षेत्रातील पाणी कमी दाबाने होणार असल्याने शुक्रवारीच नागरिकांनी पाणी भरुन ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र धरणात पाणी साठा कमी असल्याने अघोषीत पाणी कपात होत असल्याचे बोलले जात आहे.