नाशिक (प्रतिनिधी): ‘आम्ही संविधानवादी’ संघटनेच्या वतीने सोमवारी (दि.२३) जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलनकर्ते जमा होणार असल्याने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.
शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी रविवारी (दि.२२) याबाबत अधिसूचना काढली आहे. शालिमार ते सीबीएस आणि सीबीएस सिग्नल ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ये-जा करणारी दोन्ही बाजूंची वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या मार्गावरून सकाळी ९ वाजेपासून धरणे आंदोलन संपेपर्यंत वाहनचालकांना प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीबाबत हे निर्बंध घालण्यात आले आहे.
अशोकस्तंभाकडून सीबीएसकडे जाणारी वाहतूक मेहेर सिग्नल येथून एम. जी. रोडमार्गे शालिमारकडे जाईल. तसेच टिळकवाडी सिग्नलकडून शरणपूररोडने सीबीएस-शालिमारकडे जाणारी वाहने टिळकवाडी चौकातून जलतरण तलाव सिग्नलमार्गे त्र्यंबकनाक्याकडून पुढे जाईल. त्र्यंबकनाका सिग्नलकडून अशोकस्तंभाकडे जाणारी वाहतूक सीबीएस चौकातून टिळकवाडीमार्गे शरणपूररोडने पुढे मार्गस्थ होईल, असे अधिसूचनेत म्हटले आहे.