महत्वाची बातमी.. अन्यथा, दंड वसुलीसाठी पोलिस आता वाहन चालकाच्या घरी जातील
नाशिक (प्रतिनिधी): वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडून दंड वसुलीसाठी आता वाहतूक पोलिस थेट संबंधित कारवाई झालेल्या वाहनचालकाच्या घरी जाणार आहेत. इ-चलनच्या सहाय्याने दंड केलेल्या शहर व जिल्ह्यातील सुमारे १६७० नागरिकांना नोटीस बजावण्यात आली असून पथकांकडून वसुली सुरू करण्यात आली आहे. सुमारे एक कोटीचा दंड प्रलंबित असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली.
शहर वाहतूक पोलिसांनी कोरोनाकाळात इ-चलनाच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना दंड केला आहे.मात्र हा दंड वसूल झालेला नाही. हा प्रलंबित दंड वसूल करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शहर व जिल्ह्यातील १६७० वाहनचालकांना दंड भरण्याची नोटीस बजावली आहे. २०१७ मध्ये शहर पोलिसांनी इ-चलन पद्धतीने दंड आकारणी सुरू केली. वाहनचालकांकडून जागेवर दंड वसूल न करता मोबाइलवर नियम मोडल्याचा फोटो आणि दंडाचे चलन पाठवले जात आहे. यातील बहुतांशी चालक दंड भरत नसल्याचे निदर्शनास आले आहे. परजिल्ह्यातील वाहनचालकांना ऑनलाइन नोटीस बजावण्यात आली आहे. दंड भरला नाही तर स्थानिक पोलिसांच्या मदतीने दंड वसूल होईल.
नोटिसीद्वारे केले सूचित: सिग्नल नियम, वेगमर्यादा, ट्रीपलसीट, फ्रंटसीट, सीटबेल्ट व हेल्मेट वापर न करणे, कागदपत्र सोबत न बाळगणे आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना ऑनलाइन दंड केला जातो. दंड प्रलंबित ठेवणाऱ्या चालकांना नोटिसीद्वारे सूचित करून दंड वसुलीसाठी पोलिस घरी जातील.
दंडाबाबत गैरसमज: नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना इ-चलनाद्वारे दंड केला जातो. यातील बहुतांशी चालक दंड न भरत नाही. इ-चलनाद्वारे दंड झालेल्या वाहनचालकांचा हा गैरसमज आता दूर होणार असून दंड भरणे अनिवार्य आहे. अन्यथा न्यायालयात खटला पाठवला जाणार आहे. या गुन्ह्यात न्यायालयाकडून दंड आणि शिक्षेची तरतूद आहे. तर दंड न भरणाऱ्या चालकांना वाहतूक विभागाने नोटीस बजावली आहे. चालकांनी दंड भरून पोलिस प्रशासनास सहकार्य करावे व कारवाई टाळावी असे आवाहन नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी केले आहे.