नाशिक (प्रतिनिधी): दिवाळी सणाची खरेदी सुरू झाली आहे. यामुळे शहराची प्रमुख बाजारपेठ असलेल्या मेनरोड, रविवार कारंजा, दहीपूल, शालिमार, रेडक्रॉस चौक आदी भागात नागरिकांची गर्दी उसळत आहे.
यामुळे वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता निर्माण झाल्याने सर्वप्रकारच्या वाहनांना शुक्रवारपासून म्हणजेच दि.२५ ऑक्टोबर २०२४ ते ३ नोव्हेंबर २०२४ पर्यंत प्रवेश बंद करण्यात आला आहे. याबाबतची अधिसूचना वाहतूक विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे.
शहरातील मध्यवर्ती बाजारपेठांच्या परिसरात ग्राहकांची विशेषतः महिलावर्गांची गर्दी होऊ लागली आहे. खरेदीसाठी झुंबड उडत आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे सकाळी १० वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.
या मार्गावर वाहनांना ‘नो एन्ट्री’: भद्रकाली कॉर्नर ते गाडगे महाराज चौक रस्ता, रोकडोबा मैदान ते साक्षी गणेश मंदिर रस्ता, दिल्ली दरवाजा ते धुमाळ पॉइंट रस्ता, दुर्गा माता मंदिर ते मेनरोडकडे जाणारा शिवाजीरोड, रेडक्रॉस सिग्नल ते धुमाळ पॉइंट रस्ता, रविवार कारंजा ते धुमाळ पॉइंटकडे येणारा रस्ता, मालेगाव स्टॅण्ड ते रविवार कारंजाकडे जाणारा रस्ता.
याठिकाणी आहे पार्किंग: सागरमल मोदी शाळा (शालीमार), बी.डी. भालेकर मैदान, गोदाघाट, गाडगे महाराज पुलाखालील परिसर.
याठिकाणी बॅरिकेडिंग:
रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, शालिमार कॉर्नर, बादशाही कॉर्नर, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड याठिकाणी पोलिस बेरिकेडिंग राहणार आहे, तसेच पोलिस अधिकारी, अंमलदार यांची स्वतंत्ररीत्या नियुक्ती करण्यात आली आहे.