नाशिक (प्रतिनिधी): व्यापाऱ्यांच्या अडचणी समजून घेत नाशिकमधील कोरोना रुग्णसंख्येचा आढावा घेऊन व्यापार सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले.
लॉकडाऊनमुळे नाशिकमधील व्यापार – उद्योग मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. या पार्श्वभूमीवर व्यापार-उद्योग सुरू करण्यासाठी व व्यापाऱ्यांच्या विविध अडचणींसंदर्भात महाराष्ट्र चेंबरच्या व्यापारी संघटनांच्या शिष्टमंडळाने रविवारी भुजबळ यांची भेट घेतली.
नुकत्याच झालेल्या व्यापारी संघटनांच्या बैठकीत व्यापाऱ्यांनी मांडलेल्या विविध अडचणी भुजबळ यांच्यासमोर मांडल्या. त्यात प्रामुख्याने व्यापार सुरू, व्यापाऱ्यांना आर्थिक मदत मिळणे वीज बिल, मालमत्ता कर, बँक कर्जांवरील व्याज माफ करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीच्या गाळ्यांचे तीन महिन्यांचे भाडे माफ करणे, जीएसटी, इन्कम टॅक्स अशा विविध स्वरूपाचे कर भरण्यासाठी सप्टेंबर २१ पर्यंत मुदत द्यावी, लघु व मध्यम व्यापाऱ्यांना त्यांच्या वार्षिक उलाढालीच्या १० टक्के रक्कम वार्षिक ३ टक्के व्याजाने कर्ज रूपाने द्यावे आदि मागण्या केल्या व व्यापाऱ्यांच्या अडचणींबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन मंडलेचा यांनी केले.
ऑटोमोबाईल्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष सुरेश चावला यांनी अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या वाहनांसाठी स्पेअर पार्ट्सची दुकाने उघडणे गरजेचे असल्याचे सांगून दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली. विविध व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या अडचणी मांडल्या.