नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत नाशिकच्या तरुणाला सव्वा सात लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. तीन जणांनी मिळवून ही फसवणूक केली आहे. विशेष म्हणजे या तरुणाला बनावट नियुक्तीपत्र देण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल चंडालिया (रा.कोपरखैर वाशी नवी मुंबई),किशोर लोहट व अलम शेख अशी संशयित ठकबाजांची नावे आहेत. याप्रकरणी आकाश सुरेंद्र मेहरोलिया (३० रा.जयभवानीरोड,ना.रोड) या युवकाने तक्रार दाखल केली आहे.
मेहरोलिया रेल्वे नोकरभरती साठी प्रयत्न करीत असतांना सन.२०१६ मध्ये संशयितांनी त्यास गाठले होते. रेल्वेत वरिष्ठांशी मोठ्या ओळखी असल्याचे भासविण्यात आल्याने मेहरोलिया यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला.
यावेळी संशयितांनी त्यास नोकरीस लावून देतो अशी बतावणी करीत लाखों रूपयांची मागणी केली.
यानंतर तडजोडी अंती हा व्यवहार निश्चित करण्यात आला. मेहरोलिया यांनी संशयितांच्या आमिषास बळी पडून एकूण सव्वा सात लाख रूपये अदा केले. मात्र नोकरी काही लागली नाही. अखेर मेहरोलिया यांनी तगादा लावला असता संशयितांनी रेल्वेचे बनावट नियुक्तीपत्र दिले. मेहरोलिया वैद्यकीय प्रमाणपत्रासह हजर होण्यासाठी गेले असता संशयितांचा बनाव उघड झाल्याने त्यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भामरे करीत आहेत.