
नाशिक (प्रतिनिधी): शहरातील नागरिकांसोबत पोलिसांचा संवाद वाढावा जेणेकरून नागरिक-पोलिस यांचे ऋणानुबंध अधिक घट्ट होतील, या उद्देशाने या नववर्षापासून शहर पोलिस आयुक्तालयाकडून पुन्हा एकादा नागरिकांसोबत ‘मॉर्निंग वॉक’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शनिवारी (दि.४) पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गोल्फ क्लब ट्रॅकवर भेट देत व्यायाम करत नागरिकांशी संवाद साधला.
नागरिक-पोलिस यांच्यात संवाद वाढल्यास गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविणे सोपे होईल, यासाठी पोलिस आयुक्तालयाने हा उपक्रम हाती घेतला आहे. नागरिकांमध्ये अधिकाधिक सजगता यावी, हादेखील यामागील उद्देश असल्याचे सूत्रांनी सांगितले. शहरातील १३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत १८ ठिकाणी हा उपक्रम शनिवारी घेण्यात आला. पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत, प्रशांत बच्छाव, चंद्रकांत खांडवी, सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके, शेखर देशमुख, सचिन बारी, नितीन जाधव, पद्मजा बढे आदींसह प्रत्येक पोलिस ठाणे प्रमुखांनी आपापल्या हद्दीतील जॉगिंग ट्रॅकला भेट दिली.

तेथे उपस्थित ज्येष्ठ नागिरक, महिला, युवक-युवतींसोबत संवाद साधत मॉर्निंग वॉक करत चर्चा केली. परिसरात भेडसावणाऱ्या तक्रारी यावेळी नागरिकांनी पोलिसांना सांगितल्या. जॉगिंग ट्रॅकवर दुपारी व रात्रीच्यावेळी टवाळखोर, मद्यपी तसेच प्रेमीयुगलांचा वावर वाढलेला असतो, ही प्रमुख तक्रार सर्वच ठिकाणी जॉगर्सकडून मांडण्यात आली. पोलिसांनी या लोकांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही करण्यात आली. पोलिस ठाणेनिहाय तेथील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी यावेळी कारवाईचे आश्वासन दिले. उपनिरीक्षक, अंमलदार यांनी तक्रारी नोंदवून घेतल्या.
…या जॉगिंग ट्रॅकवर पोलिसांची भेट:
पंचवटी- गोदापार्क, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक, अमृत उद्यान (ना.रो), तपोवन जॉगिंग ट्रॅक, कोणार्कनगर परिसर, उत्तमराव ढिकले जॉगिंग ट्रॅक, मिनाताई ठाकरे स्टेडियम, जिजामाता ठाकरे स्टेडियम, सुयोजित गार्डन मखमलाबाद, सावरकर गार्डन, दिंडोरी रोड, चामरलेणी, बोरगड, वि. वा. शिरवाडकर जॉगिंग ट्रॅक, शरणपूर, रामदास गार्डन, त्रिकोणी गार्डन- काठेगल्ली, समर्थ जॉगिंग ट्रॅक, राजे संभाजी स्टेडियम, आश्विननगर, पवननगर स्टेडियम, महालक्ष्मी जॉगिंग ट्रॅक, गामणे मळा जॉगिंग ट्रॅक आदी ठिकाणी पोलिस अधिकारी, अंमलदार यांनी भेट देत संवाद साधला.
पोलिस-जनतेमध्ये सुसंवाद वाढावा आणि जनतेच्या तक्रारी त्यांच्याकडे जाऊन पोलिसांना जाणून घेता याव्यात, जेणेकरून त्यावर तोडगा काढून उपाययोजना करणे अधिक सोपे होईल, यासाठी हा उपक्रम आयुक्तालयाकडून राबविण्यात आला आहे. सर्व पोलिस ठाणे हद्दीतील पोलिस अधिकारी, अंमलदार यांनी भेटी दिल्या असून, नोंदी घेतल्या आहेत.
– संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त
![]()


