नाशिक (प्रतिनिधी): गेल्या काही आठवड्यात अंबड, उपनगर आणि नाशिकरोड परिसरात गुन्हेगारीने डोके वर काढले होते. त्यामुळे शहर पोलिसांवर मोठी टीकेची झोडही उठली. त्यातच पालकमंत्र्यांनीही आढावा घेत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याच्या सूचना केल्या होत्या.
त्या पार्श्वभूमीवर परिमंडळ दोन अंतर्गत पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. अचानक राबविलेल्या या ऑपरेशनमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून, या कारवाईत ५९ टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली.परिमंडळ दोन अंतर्गत शहर आयुक्तालयातील सातपूर, अंबड, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड व देवळाली कॅम्प या पोलीस ठाण्यांचा समावेश होतो. उपनगर, नाशिकरोड आणि अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीने डोके वर काढले.
त्यामुळे त्या परिसरात अशांतता निर्माण होऊन नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांच्या नेतृत्वाखाली कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी तडीपार करण्यात आलेल्या २६ गुन्हेगारांची तपासणी केली. या गुन्हेगारांच्या घरांची झडती घेण्यात येऊन त्यांच्या नोंदी घेण्यात आल्या. तसेच, ५९ टवाळखोरांविरोधात कारवाई करण्यात आली.
रेकॉर्डवरील सराईत असे ८९ गुन्हेगारांची तपासणी केली असता ५८ गुन्हेगार मिळून आले. तसेच, शरीराविरुद्ध गुन्हे असलेले ८८ गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख, सहायक आयुक्त आनंदा वाघ, अंबादास भुसारे, नितीन जाधव, सिद्धेश्वर धुमाळ यांच्यासह संबंधित पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकार्यांसह गुन्हेशोध पथक व पोलीस कर्मचार्यांचा ताफा सहभागी होता.