बाहेरच्या शहरातून आलेल्या लोकांना यंत्रणा का रोखू शकली नाही ?

नंदिनी मोरे, नाशिक
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतभर सलग तीन लॉक डाऊन लागू करण्यात आले. सुरवातीला नाशिक शहरात एकही कोरोना बाधित रुग्ण नव्हता, परंतु त्यानंतर जसजसा लॉकडाऊनचा कालावधी वाढत गेला तसतसं कोरोना बाधितांच्या संख्येतही वाढच होत गेली. आणि दुसरीकडे लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यामुळे रस्त्यांवरची आणि दुकानांमधली गर्दीही वाढत जातेय असं चित्र आहे..

मुळात कोरोनाची साखळी तुटावी यासाठी लॉकडाऊन होता… मग, सलग तिसरे लॉकडाऊन सुरू असताना देखील कोरोनाचा संसर्गाची वाढण्याची कारणं काय आहेत ? शहरात ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येतो तो परिसर प्रतिबंधित करण्यात येते. तसेच या क्षेत्रात आरोग्य विभागाची विविध पथकं दैनंदिन सर्वेक्षण करून संशयित रुग्णांचा शोध घेतात. तरीही नाशिक शहरातील बाधितांना आकडा का वाढतोय असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे. कारण नाशिककरांनी संपूर्ण लॉकडाऊन प्रामाणिकपणे पाळला होता.. मग रुग्णांची संख्या वाढण्यासारखं असं काय घडलं ?

हे ही वाचा:  नाशिक: बेकायदा होर्डिंग्ज हटविण्यासाठी मनपाकडून १५ दिवसांची मुदत

नाशिक शहरामध्ये आढळून आलेले बहुतांश रुग्ण हे कोरोना बाधित क्षेत्रातून आलेले आहेत. बाधित क्षेत्रातून येणाऱ्या नागरिकांमुळे हा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्यामुळे प्रशासनावरचा ताणही वाढतोय. त्याचप्रमाणे, गेल्या काही दिवसात रिपोर्ट्स येण्यात विलंब होत होता.. त्याबाबत जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी स्पष्टीकरणही दिले होते.

जिल्हाधिकारी सुरज मांढरे म्हणाले होते, “लॅब मध्ये काही गोष्टी स्थायी स्वरूपाच्या असतात व काही गोष्टी कन्सुमेबल स्वरूपाच्या असतात.  त्या वेळोवेळी संपत असल्याने त्यांचे संदर्भात थोडी अनिश्चितता नेहमीच असते. अशी बाब राज्यभरातल्या अनेक लॅब च्या बाबतीत होते. ज्यावेळी आपल्या जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत होता त्यावेळेला एकापेक्षा अधिक लॅब दिमतीला असणे अत्यावश्यक असल्याने वेगवेगळ्या लॅबमध्ये आपण कोटा मंजूर करून घेत होतो जेणेकरून रिपोर्ट लवकर मिळावेत. लॅब चालवणे ही पूर्णपणे तांत्रिक बाब असून तेथे कोणती सामग्री लागते याबद्दल तंत्रज्ञांनी आपसात समन्वय ठेवून त्याची जिल्हा रुग्णालयाकडे मागणी नोंदवणे, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी त्यास प्रशासकीय मान्यता प्राप्त करून घेणे  व  त्याचा पुरवठा लॅब ला करणे अभिप्रेत आहे. यापुढे या कारवाईमध्ये अधिक सुसूत्रता रहावी याकरता एक वैद्यकीय अधिकारी डॉ लाहाडे यांची पूर्णवेळ नियुक्ती या कामासाठी करण्यात आलेली आहे.”

हे ही वाचा:  नाशिक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील वाहतूक मार्गांत महत्वाचे बदल !

पण मुळात विषय हा आहे की, लॉकडाऊनच्या काळात सीमा बंदी असतानाही लोकं कोरोनाबाधित क्षेत्रातून नाशिक शहरात नागरिक येतातच कसे ? नाशिक महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी वारंवार हे सांगितलं होतं, की नाशिकमध्ये जी कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय ती कोरोनाबाधित क्षेत्रातून किंवा शहरातून येणाऱ्या लोकांमुळे वाढतेय. पण त्यांच्या या सांगण्याकडे दुर्लक्ष का केलं गेलं.. आणि कुणी केलं..? तरीही सद्यस्थिती बघता लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात देखील बाधितांचा वाढता आकडा हा चिंताजनकच आहे…!

हे ही वाचा:  जिल्ह्यात सोमवारपासून जलसमृद्ध नाशिक अभियान- जिल्हाधिकारी जलज शर्मा

नाशिक जिल्ह्यामधील कोरोना बाधितांचा आकडा हा मालेगाव मध्ये सर्वाधिक आहे. अशा परिस्थितीत मालेगाव मधील नागरिक बिनधास्तपणे शहरात प्रवेश करताना आढळतात. जर हे लोकं छुप्या मार्गाने येत असतील तर त्यांच्यावर कारवाई करणं आवश्यक आहे, नव्हे, तर त्या आधीही “सिस्टीम”मधले “लूपहोल” शोधणं गरजेचं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर इतर शहरातून लोकं नाशिक शहरात येत असतांना ते कसे येताय हा प्रश्न प्रशासनाला पडूच नये ?

नाशिकमध्ये कोरोनाबाधीतांची संख्या गेल्या काही दिवसात वाढली आहे.. ही परिस्थिती आटोक्यात आणायची असेल तर लॉकडाऊनचे नियम पाळणे व बाहेरून म्हणजेच कोरोनाबाधित क्षेत्रातून येणाऱ्यांना शहरात प्रवेश न देणे हाच सुवर्णमध्य आहे…!

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790