शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनच्या प्रयत्नांना यश
नाशिक (प्रतिनिधी): नंदिनी नदीचे संरक्षण व्हावे आणि प्रदूषण रोखले जावे, यासाठी या नदीच्या दोन्ही किनारी उंटवाडी ते गोविंदनगरपर्यंत २३ ठिकाणी पंच्चावन्नहून अधिक कॅमेरे बसविण्याचे काम स्मार्ट सिटीने सुरू केले आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना सावध करता यावे, यासाठी ५३ ध्वनीक्षेपकाचीही सुविधा देण्यात आली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनच्या प्रयत्नांना यश आले आहे. सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांनी महापालिका व स्मार्ट सिटीचे आभार मानले आहे. प्रदूषण रोखण्यासाठी नदीकिनारी सीसीटीव्हीची यंत्रणा कार्यान्वित करणे हा राज्यातील पायलट प्रोजेक्ट ठरणार आहे.
नंदिनी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात घाण व कचरा टाकून प्रदूषण केले जाते, वाळू उपसाही होतो. मद्यपी, गर्दुल्ले, गुन्हेगार येथे येतात. नंदिनीमुळे गोदावरीचेही प्रदूषण वाढते. नागरिकांना गुन्हेगारीचा त्रास होतोच; परंतु त्यांचे आरोग्यही धोक्यात येते. प्रदूषण रोखण्याला मदत व्हावी, नदी व परिसरातील नागरिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी नदीच्या दोन्ही किनारी उंटवाडी ते गोविंदनगरपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, अशी मागणी शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनने बाबासाहेब गायकवाड (देशमुख), चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने महापालिका आयुक्त आणि स्मार्ट सिटीकडे ७ व ८ डिसेंबर २०२१ रोजी केली होती.
सततच्या पाठपुराव्यानंतर महापालिका आयुक्तांनी हा विषय १६ मार्च २०२२ ला स्मार्ट सिटीकडे पाठविला. स्मार्ट सिटी संचालक मंडळाने २३व्या बैठकीत २४ सप्टेंबर २०२२ रोजी या विषयाला अंतिम मंजुरी दिली. आता सिटी सेंटर मॉलची मागची बाजू, महालक्ष्मी मंदिर, म्हसोबा महाराज मंदिर, दोंदे पूल, बाजीरावनगर, मिलिंदनगर, उंटवाडी, छत्रपती संभाजी महाराज चौक, सिटी सेंटर मॉल चौकातील पूल, गोविंदनगर, मुंबई नाक्यापर्यंत अशा एकूण २३ ठिकाणी ५५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
यात बुलेट, पीटीझेड, मल्टीसेन्सर या प्रकारच्या कॅमेर्यांचा समावेश आहे. पूरपरिस्थितीसह आपत्कालीन स्थितीत नागरिकांना सावध करता यावे, यासाठी ५३ ध्वनीक्षेपक बसविण्यात येत आहेत. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर नंदिनी नदीचे प्रदूषण रोखण्याला मोठी मदत होणार आहे. सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, धवल खैरनार, संगीता देशमुख, फकिरराव तिडके, विठ्ठलराव देवरे, बापूराव पाटील, भालचंद्र रत्नपारखी, ओमप्रकाश शर्मा, बाळासाहेब देशमुख, दिलीप निकम, निलेश ठाकूर, यशवंत जाधव, मनोज वाणी, दिलीप दिवाणे, अशोक पाटील, अनंत संगमनेरकर, बाळासाहेब राऊतराय, आनंदराव तिडके, सतीश मणिआर, शैलेश महाजन, भारती देशमुख, मीना टकले, वंदना पाटील, दीपक दुट्टे, प्रथमेश पाटील आदींसह रहिवाशांनी महापालिका व स्मार्ट सिटीचे आभार मानले आहे.