नाशिक (प्रतिनिधी): महापालिकेच्या सिडको विभागाअंतर्गत अतिक्रमण मोहिमेपाठोपाठ आता थेट नळाला मोटारी लावणाऱ्यांविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. पाणी मीटर नसेल तर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत दहा मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत.
मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार सिडको परिसरातील प्रभाग क्रमांक २४ मधील महाराणा प्रताप चौक व सप्तशृंगी चौकात पाणीपुरवठा विभाग, घरपट्टी व पाणीपट्टी तसेच आरोग्य विभागामार्फत संयुक्तरित्या ही धडक मोहीम हाती घेण्यात आली. परिसरात बऱ्याच ठिकाणी नळ कनेक्शन धारकांनी थेट नळाला मोटर लावल्याने दहा मोटारी जमा करून घेण्यात आल्या आहेत.
तसेच नळांना तोट्या नसलेल्या दहा जणांवर दंडात्मक कारवाई करून तोट्या बसविण्यात आल्या. घरपट्टी पाणीपट्टी विभागामार्फत मीटर नसलेल्या तसेच मीटर बंद असलेल्या नळ धारकांना दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. आरोग्य विभागामार्फतही दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. ही मोहीम विभागीय अधिकारी जयश्री बैरागी व पाणीपुरवठा उपअभियंता ए. जे. काझी आदींसह कर्मचारी सहभागी झाले आहेत.