महानुभाव पंथाच्या जुन्या ग्रंथांचे कायमस्वरूपी संवर्धन करणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक (प्रतिनिधी): महानुभाव पंथाच्या जुन्या ग्रंथांचे जतन, संवर्धन होणे गरजेचे आहे. महानुभाव पंथाच्या या सर्व जुन्या ग्रंथांचे मराठी भाषा विद्यापीठाच्या माध्यमातून संगणकीकृत यंत्रणेद्वारे कायमस्वरूपी जतन करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

कवी कालिदास नाट्यमंदिर येथे अखिल भारतीय महानुभाव पंथाद्वारे उपमुख्यमंत्री‌ फडणवीस यांचा कृतज्ञता व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, कारंजेकर बाबा, चिरडे‌‌ बाबा, आचार्य अमरावतीकर बाबा, आचार्य विद्वान बाबा, बाभूळगावकर बाबा शास्त्री, नांदेडकर महाराज, बीडकर बाबा (रणाईचे), प्रकाश नन्नावरे, अविनाश ठाकरे, राजेंद्र जायभावे, दिनकर पाटील आदी उपस्थित होते.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात सकाळी ७ ते ११ दरम्यान झाले इतके टक्के मतदान…

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महानुभाव पंथाने अतुलनीय ग्रंथसंपदा समाजाला दिली आहे. समाजाला सर्व मोहापासून मुक्त करून व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी महानुभाव पंथाने दिलेले योगदान मोलाचे आहे. यासोबतच आपली संस्कृती, विचार आणि वाङ्मय जीवंत ठेवण्याचे काम महानुभाव पंथाने केले.  चक्रधर स्वामींचा विचार समाजाला समतेकडे नेणारा आहे. विषमता मुक्त समाज निर्माण करण्याचे काम महानुभाव पंथाकडून अविरतपणे सुरू आहे.

हे ही वाचा:  नाशिक: वेब कास्टिंग कक्षाद्वारे जिल्ह्यातील मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे निरीक्षण

महानुभाव पंथाशी माझे अतिशय जवळचे ऋणानूबंध आहेत. यातूनच रिद्धपूर विकास आराखडा, रिद्धपूर येथे मराठी भाषेचे पहिले मराठी विद्यापीठ स्थापन केले. रिद्धपूर येथे विद्यापीठ स्थापनेबरोबरच देशांतील अभ्यासक आले पाहिजेत, अशी विद्यापीठाची अप्रतिम इमारत व ग्रंथसंपदा तयार करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. तसेच महानुभाव पंथातील महत्त्वाचे मठ, स्थळे, मंदिरांच्या विकासासाठी शासनस्तरावर निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

हे ही वाचा:  नाशिक: खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी

आजचा सोहळा माझ्यासाठी कृतज्ञता सोहळा नसून महानुभाव पंथाचा आशीर्वाद ग्रहण करण्याचा सोहळा असल्याची भावना ही त्यांनी यावेळी सत्काराला उत्तर देतांना व्यक्त केली‌. महानुभाव पंथातील ग्रंथांचे स्मृती चिन्ह, मानपत्र व मोत्यांची माळ देऊन उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी चिरडे बाबा, अविनाश ठाकरे, कारंजेकरबाबा यांची भाषणे झाली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790