नाशिक (प्रतिनिधी): व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांचे जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रमाणपत्र प्रलंबित आहेत, अशांसाठी समितीच्या वतीने विशेष मोहिमेचे आयोजन १४ ते २८ नोव्हेंबर दरम्यान केले असून संबंधित विद्यार्थ्यांनी या मोहिमेत उपस्थित राहून आपल्या प्रमाणपत्रांसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याची संधीही मिळाली आहे.
२०२४- २५ या शैक्षणिक वर्षात अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन, वास्तुशास्त्र, फार्मसी, विधी व बी. एड. या व्यावसायिक अभ्यासक्रमांना एसईबीसी, अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आरक्षित प्रवर्गातून प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे.
त्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे पडताळणीसाठी अर्जही केलेत, परंतू अनेकांना प्रमाणपत्रच मिळाले नाही. अर्जही प्रलंबित आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी हे विशेष त्रुटी पूर्तता मोहिम आयोजित केल्याची माहिती समितीचे संशोधन अधिकारी योगेश पाटील यांनी केले आहे.
त्रुटींची माहिती इ-मेलने:
जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रकरणे त्रुटी पूर्ततेअभावी अर्जदारस्तरावर प्रलंबित आहे. संबंधित अर्जदारांना ई-मेलवर त्रुटी कळवल्या आहेत. त्यांची पूर्तता न झाल्याने ज्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यांना त्रूटी व मूळ कागदपत्रांसह १४ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत दुपारी १२ ते ४ या वेळेत समिती कार्यालयात उपस्थित रहावे.