नाशिक (प्रतिनिधी): जीवघेण्या नायलॉन मांज्यामुळे ९ वर्षीय मुलाचा जीव गेल्याने नायलॉन मांजा वापरणाऱ्यांसह विक्रेत्यांवर कारवाईसाठी नागरिक आक्रमक झाले आहेत. याची दखल घेत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नायलॉन मांजा कारवाईसाठी विशेष पथके नेमली आहेत.
शहरात कुठेही नायलॉन मांजा विक्री वा वापर होत असल्यास थेट आयुक्तांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावरच तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नायलॉन मांजावर बंदी असताना शहरात मात्र सर्रासपणे मांजा विक्री होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
चार दिवसांपूर्वी वडाळा येथे ९ वर्षाच्या मुलाच्या पायात मांजा अडकून मांडीची नस कापली गेली. अतिरक्तश्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नायलॉन मांजाविरोधात नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला. पोलिस आयुक्तांनी त्याची दखल घेत मांजा विक्रेते आणि वापर करणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना विशेष पथकाला आणि पोलिस ठाण्यांना दिल्या आहेत. त्यानुसार कारवाई होणार आहे.
इथे करा तक्रार:
शहरात कुठेही नायलॉन मांजा विक्री वा वापर होत असल्याची माहिती मिळाल्यास पोलिस आयुक्तांच्या 9923323311 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत संबंधित पोलिस ठाण्याकडून कारवाई केली जाईल. यात तक्रारदाराचे नाव गोपनिय ठेवले जाईल, नागरिकांनी निर्भीडपणे तक्रार करण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.