नाशिक (प्रतिनिधी): के. के. वाघ महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आत्महत्येची घटना काही दिवसांपूर्वीच घडली असताना, जुना गंगापूर नाका परिसरातील खासगी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या १७ वर्षीय युवतीने इमारतीच्या टेरेसवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
अनिशा भटू पाटील (वय १७, मूळ रा. बैजाजी, ता. शहादा, जि. नंदुरबार, सध्या रा. ठक्कर इस्टेटजवळ, जुना गंगापूर नाका) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे.
ही घटना सोमवारी (ता. ७) दुपारी दोनला घडली. अनिशा ही कॅनडा कॉर्नर येथील खासगी क्लासेसमध्ये शिक्षण घेत होती. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास तिने खासगी वसतिगृहाच्या पाचव्या मजल्यावरून थेट खाली उडी घेतली. यात तिच्या डोक्याला, पाठीला, पोटाला गंभीर दुखापत झाली.
तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले. अनिशाच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. तिच्या नातलगांना घटनेची माहिती कळविण्यात आली असून, याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (सरकारवाडा पोलीस स्टेशन, ए.डी. रजिस्टर नं. ८८/२०२४)