नाशिक (प्रतिनिधी): पंचवटी व जुने नाशिक भागातील ५० ते ६० वर्षे जुने असे ११८१ धोकेदायक वाडे व इमारती असून त्यापैकी ४६७ अतिधोकेदायक इमारती, वाड्यांना पालिकेने नोटिसा दिल्यानंतरही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आता त्यांचा वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आहेत. पावसाळ्यानंतर महाराष्ट्र महापालिका अधिनियम २६८ नुसार पोलिसांच्या मदतीने घरे व इमारती खाली करण्यात येतील, असा थेट इशाराच प्रशासनाने दिला आहे.
सर्वसाधारणपणे कोणत्याही इमारतीला ३० वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याचे स्ट्रक्चरल ऑडिटकरून संबंधित इमारतीची क्षमता तपासली जाते. सद्यस्थितीत शहरात सव्वा पाच लाख मिळकती असून त्यापैकी साधारण साडेतीन लाख मिळकती या ३० वर्षांपेक्षा अधिक जुन्या आहेत. यापैकीच साधारण ११८१ धोकेदायक वाडे व घरे असून प्रामुख्याने ते शहरातील जुने नाशिक, पंचवटी, नाशिकरोड, देवळालीगाव, सातपूर या गावठाणांमध्ये आहेत.
दरवर्षी पावसाळा आल्यानंतर हे धोकेदायक वाडे उतरवण्यासाठी नोटीस दिली जाते. मात्र घरमालक व भाडेकरू यांच्यातील मालकी हक्काच्या वादातून जीव मुठीत धरून या ठिकाणी रहिवास केला जात आहे. जागा खाली केली तर मालकी हक्क जाईल म्हणून ही जागा ते सोडत नसल्याने पालिकेने पाऊल उचलले आहे.
विभागनिहाय धोकादायक वाडे: पश्चिम: ६९०, सातपूर:६१, पूर्व: १२७, सिडको: ५०, पंचवटी: १७६, नाशिक रोड: ७७. एकूण ११८१.
![]()

