साई मंदिराच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त निघणार मिरवणूक
नाशिक (प्रतिनिधी): जुने सिडको परिसरातील ओम साईनाथ ट्रस्टतर्फे श्री साईनाथ मंदिराच्या १३ व्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवारी (दि. १०) विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
शुक्रवारी या सोहळ्यानिमित्त मिरवणूक काढण्यात येईल. श्री साईबाबांनी वापरलेल्या पादुका व अंगरख्याचे भाविकांना दर्शन घडणार आहे. या सोहळ्यानिमित्त ५००० हून अधिक भाविकांना महाप्रसाद वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.
अक्षय्यतृतीयेच्या दिवशी शुक्रवारी (दि १०) सायंकाळी ५ वाजता मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त श्री साई पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत विविध ढोलपथके, चलचित्र, साई रथाचा समावेश असेल. शनिवारी (दि. ११) सायंकाळी ५ वाजता महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. भाविकांनी या सोहळ्याचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ओम साईनाथ ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी केले आहे.