नाशिक: शहरातील विविध भागांत अनधिकृत फलक लावणाऱ्यांविरुद्ध मनपाची कारवाई

नाशिक (प्रतिनिधी): इंदिरानगर येथील जॉगिंग ट्रॅक परिसरात विना परवानगी जाहिरातीचा फलक लावल्याप्रकरणी महापालिकेच्या पूर्व विभागाच्या वतीने चार व्यावसायिकांविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनपा पूर्व विभागातील जुबेर सय्यद व सचिन देवरे यांना विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांनी हद्दीतील बेकादेशीर जाहिरात फलकांवर कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अतिक्रमण विभागाचे पथक प्रमुख जीवन ठाकरे यांच्यासह कर्मचारी इंदिरानगरातील जॉगिंग ट्रॅक परिसरात दाखल झाले. याठिकाणी त्यांना जाहिरात विभागाच्या परवाना विभागाची कोणतीही परवानगी न घेता काही खासगी गृहनिर्माण संस्थांच्या नावांची अनधिकृत फलक लावलेले आढळून आले. सय्यद व देवरे यांच्या फिर्यादीवरून अनधिकृत फलक लावणाऱ्या चौघाविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईची बॅनरबाजांना धडकी भरली असून काहींनी स्वतःहून फलक काढून घेतले. महापालिकेने अशीच कारवाई कायमस्वरुपी सुरु ठेवावी, अशी मागणी परिसरातील त्रस्त रहिवाशांनी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरण; काही भागांत हलक्या पावसाची शक्यता

आडगावला मनपा पोलवर फलक:
क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ मनपाच्या विद्युत पोलवर मनपाच्या जाहिरात व परवाना विभागाची कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी न घेता फलक लावल्याप्रकरणी चौघांवर आडगाव पोलिस ठाण्यात महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अनधिकृत फलकप्रकरणी मनपाचे कर्मचारी भूषण देशमुख यांनी आडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मंगळवारी देशमुख कर्तव्यावर असताना क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाबाहेर मनपाच्या विद्युत पोलवर विविध आस्थापनांचे फलक दिसले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शेअर ट्रेडिंगच्या आमिषातून ज्येष्ठ नागरिकाची ९९.५० लाखांची फसवणूक

म्हसरूळ शिवारात अनधिकृत फलक:
सावरकर उद्यान तसेच दिंडोरी रोडवरील शनी मंदिर परिसरात रस्त्यावर मनपाची कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी न घेता अनधिकृत जाहिरात फलक लावल्याप्रकरणी दोन व्यावसायिकांवर म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनपा कर्मचारी वैभव वेताळ यांनी म्हसरूळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790