नाशिक (प्रतिनिधी): राज्यात लोकसेवा हक्क कायदा 28 एप्रिल 2015 पासून अंमलात आला. शासनाच्या विविध विभागांकडून, अधिसूचित केलेल्या विविध सेवा, ठराविक मुदतीत प्राप्त करून घेण्याचा अधिकार या कायद्यामुळे नागरिकांना प्राप्त झाला आहे. या विविध अधिसूचित केलेल्या सेवांची आपले सरकार केंद्र चालकांनी माहिती घेवून लोकसेवा हक्क कायद्याीच प्रभावी अंमलबजावणी करावी, असे प्रतिपादन नाशिक विभागाच्या राज्य सेवा हक्क आयोग आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे नाशिक तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग, नाशिक आयोजित महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा- २०१५ माहिती आणि प्रशिक्षण कार्यक्रमात श्रीमती कुलकर्णी बोलत होत्या. यावेळी उपजिल्हाधिकारी (प्रशासन) तुकाराम हुलावळे, नाशिक विभाग राज्य सेवा हक्क आयोगाचे उप सचिव सुनील जोशी तहसीलदार मंजुषा घाटगे, सहाय्यक कक्ष अधिकारी प्रशांत घोडके, महाआयटीचे जिल्हा समन्वयक राहुल धिवरे, अमोल दंडगव्हाळ यांच्यासह जिल्ह्यातील आपले सरकार केंद्रांचे चालक उपस्थित होते.
श्रीमती कुलकर्णी म्हणाल्या की, महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग स्थापनेस 3 वर्षे पूर्ण झालेली आहेत. आपले सरकार केंद्रांचे केंद्रचालक हे नागरिक व प्रशासन यांच्यामधील दुवा आहेत. त्यामुळे नागरिकांना वेळेत सेवा पुरविणे हे प्रत्येक केंद्रचालकचे कर्तव्य आहे. मुदतीत सेवा मिळण्याचा हक्क कायद्याने नागरिकांना दिल्यामुळे आता आपले सरकार केंद्रावर विहित मुदतीत सेवा प्राप्त न झाल्यास ते अपील करू शकतात. आपले सेवा केंद्र चालकांनी या अपील सेवेबाबत नागरिकांना माहिती देणे आवश्यक आहे. अपील सेवेबाबतची माहिती आपले सरकार केंद्राच्या आवारात दर्शनी भागात फलकाद्वारे लावल्यास नागरिकांना त्याबाबत माहिती मिळेल. केंद्रचालकांनी आपले दैनंदिन अर्ज त्याच दिवशी निकाली काढल्यास अर्ज प्रलंबित न राहता कामास गती मिळेल.
उपजिल्हाधिकारी हुलावळे यांनी आपले सरकार केंद्रचालकांना आपल्या कामात सुसूत्रता येण्यासाठी कार्यपद्धती यासोबतच विविध दाखल्यांसाठी लागणारे शासकीय दर याबाबाबत नागरिकांना माहिती उपलब्ध करून देणे, कामात दिरंगाई केल्यास त्याबाबत होणारी कार्यवाही याबाबत मार्गदर्शन केले. तसेच केंद्रचालकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन नेहमीच सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.
नागरिकांच्या अर्जाची वेळेत निर्गती करणे हे प्रशासनाचे प्रमुख कार्य आहे. नागरिकांना तत्परतेने सहज व सुलभतेने सेवा मिळण्यासाठी आपले सरकार सोबतच अनेक पोर्टल सुरू करण्यात आले आहे. शासनाच्या ३८ विभागांमार्फत ७७० सेवा शासनाने अधिसूचित केल्या आहेत. त्यापैकी ४८५ सेवा ऑनलाईन तर २८५ सेवा ऑनलाईन सद्यस्थितीत सुरू आहेत. ऑनलाईन अपील सेवाही आपले सेवा केंद्रावर नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे राज्य सेवा हक्क आयोगाचे उप सचिव सुनील जोशी यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तहसीलदार श्रीमती घाडगे यांनी केले. यावेळी उपस्थित आपले सेवा केंद्रचालकांना शासनाच्या पोर्टलचा उपयोग कसा करावा याबाबत चित्रफितीद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.