नाशिक (प्रतिनिधी): काही दिवसांपूर्वी मुंबईतील अटल सेतू पुलावरून समुद्रात उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवतीचे प्राण मुंबई वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाचविले होते. या घटनेची पुनर्रावृत्ती मुंबई- आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर घडली. शनिवारी (ता. २८) रात्री पावणेदहाच्या सुमारास वाहतूक शाखेच्या युनिट एकचे उपनिरीक्षक रमेश पवार, अंमलदार अशोक बेनके हे मुंबई- आग्रा महामार्गावरील रासबिहारी चौकातून जात होते.
त्या वेळी एक व्यक्ती उड्डाणपुलावरून खाली उडी मारण्याच्या प्रयत्नात होता. त्या वेळी दोघांनी दुचाकी थांबविली आणि धाव घेतली. तो उडी मारण्याच्या बेतात असतानाच त्यास पकडले. त्यानंतर त्यास शहर वाहतूक शाखा युनिट एकच्या कार्यालयात वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे याच्याकडे आणले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्यास तीन मुली आहेत. मुलींची शाळेची फी भरता न आल्याने निराशेपोटी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. हांडे यांनी त्याचे समुपदेशन करीत आत्महत्येपासून परावृत्त केले.
वाहतूक पोलिसांनी त्यास त्याच्या घरी पोच केले. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे तीन मुलींच्या पित्याचा जीव वाचल्याने समाधान व्यक्त केले.
समस्यांमुळे नैराश्य: सदर पिता हा तीन मुली, पत्नी, आईवडिलांसमवेत राहतो. त्याची पत्नीही कामाला जाते. स्वतःला किडनी स्टोनचा आजार असून, आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यात तीन मुली असून, त्यांच्या शाळेची फी भरता आलेली नाही. त्यामुळे त्याने नैराश्यातून आत्महत्येसाठी उड्डाणपूल गाठला होता. सुदैवाने वेळीच पोलिसांनी त्याचे प्राण वाचविले.