नाशिक (प्रतिनिधी): निचांकी थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटीजवळ बसलेल्या ३३ वर्षीय मद्यधुंद युवकाचा ताेल जाऊन ताे शेकाेटीवर भाजल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली असून शवविच्छेदन अहवाल तसेच एडीच्या तपासानंतर मृत्यूचे नेमके कारण समाेर येणार आहे. मृत युवक हा फिरस्ता असल्याची नाेंद पाेलिसांनी केली आहे. राधेश्याम राम चेतन (३३,रा. मुळ सिकरी, उत्तरप्रदेश, सध्या रा. पाथर्डीफाटा, नाशिक) असे मृताचे नाव आहे.
पाथर्डीफाटा येथील एका लॉन्सच्या पाठीमागे विश्व अपार्टमेंटजवळच्या पत्र्याच्या शेडलगत मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास मद्यपान करून शेकोटी पेटविण्यात आली होती. या शेकोटीभोवती राधेश्याम हा शेकत असताना त्याचा तोल गेला. त्यानंतर तो शेकोटीत पडला. त्यात त्याचा भाजून मृत्यू झाल्याचे थेट सकाळी उघडकीस आले. इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला. इंदिरानगर पाेलिस तपास करत आहेत. (इंदिरानगर पोलीस स्टेशन, अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक: १६४/२०२४)