नाशिक (प्रतिनिधी): शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने महापालिकेच्या वैद्यकीय व मलेरिया विभागाने निर्मूलनाची चळवळ हाती घेतली आहे. दंडाबाबत नागरिक फारसे गंभीर नसल्याचे लक्षात घेत निवासी भागात आता प्रतिस्पॉट दोनशे ऐवजी पाचशे रुपये, तर बांधकामाच्या साइटवर पाचऐवजी दहा हजार रुपये अशी दंडात्मक कारवाई हाती घेतली जाणार आहे.
शहरामध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहे. डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मागील आठवड्यात केंद्रीय समितीने महापालिका क्षेत्रात भेट दिली होती. समितीलादेखील डेंग्यू उत्पत्तीची स्थळे आढळून आल्याने महापालिकेने उत्पत्ती स्थळे नष्ट करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यात वैद्यकीय विभागाकडून १७५ पथकांची निर्मिती पहिल्या टप्प्यात करण्यात आली आहे. पथकामार्फत घर भेटी देऊन डास उत्पत्ती स्थळे शोधली जात आहे. मागील तीन दिवसांमध्ये ४९२ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
त्यांच्याकडून प्रतिस्पॉट दोनशे रुपये याप्रमाणे १ लाख १३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. महापालिकेमार्फत डेंग्यू उत्पत्तीची स्थळे नष्ट केली जात असताना नागरिकांनीदेखील त्यास प्रतिसाद देऊन घराच्या परिसरातील डेंग्यू उत्पत्तीची स्थळे नष्ट करणे अपेक्षित आहे. मात्र नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे दंडाची रक्कम वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवासी ठिकाणी प्रतिस्पॉट दोनशे रुपये दंड केला जात आहे.
मात्र त्यात आता वाढ करण्यात आली असून, पाचशे रुपयांपर्यंत प्रतिस्पॉट दंड केला जाणार आहे. बांधकाम व्यवसायिकांना प्रतिस्पॉट पाच हजार रुपये असा दंड सध्या आकारला जात आहे. त्यात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, प्रतिस्पॉट दहा हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. गॅरेजमध्ये डेंग्यू उत्पत्तीची साधने आढळल्यास १ हजार रुपयांऐवजी पाच हजार रुपये दंड केला जाणार आहे. या संदर्भात महापालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.