नाशिक। दि. २३ डिसेंबर २०२५: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटी परिसरातील रामकाल पथ विकासकामांना गती देण्यात आली आहे. या अंतर्गत रविवारी (दि. २१) रामकुंड परिसरात असलेली पोलिस चौकी जमीनदोस्त करण्यात आली. यापूर्वी रामकाल पथासाठी वस्त्रांतर गृहाची इमारत हटविण्यात आली होती. आता चौकीसमोरील पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे पाडकामही लवकरच हाती घेतले जाणार असून, त्याची तयारी सुरू आहे.
अजगरेश्वर महाराज मठालगत यापूर्वी पत्र्याच्या शेडमध्ये कार्यरत असलेली पोलिस चौकी नंतर पक्क्या बांधकामात रूपांतरित करण्यात आली होती. मात्र, या ठिकाणी बांधकामास मठ प्रशासनाने हरकत घेत, तेथे बांधकाम करता येणार नसल्याची नोटीस लावली होती. असे असतानाही विटांचे बांधकाम करून चौकी उभारण्यात आली होती.
पोलिस चौकीचे काम पूर्ण झाल्यानंतर आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने काही काळ ती बंद अवस्थेत राहिली होती. रामकाल पथाच्या प्रस्तावित कामासाठी शनिवारी चौकी हटविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यामध्ये प्रथम खिडक्या व दरवाजे काढण्यात आले. त्यानंतर वरच्या बाजूचे रेलिंग तसेच लोखंडी जिना हटविण्यात आला. पुढे जेसीबीच्या साहाय्याने संपूर्ण पोलिस चौकी पाडण्यात आली.
चौकीनंतर आता समोरील पिण्याच्या पाण्याच्या जलकुंभावर पाडकामाची कारवाई होणार असून, त्यासाठीची पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली आहे. जलकुंभावरील खिडक्यांचे गज, काचा, रेलिंग आणि जिना आधीच काढण्यात आले आहेत. या पाडकामानंतर रामकुंड परिसर अधिक मोकळा होणार असून, रामकाल पथाच्या विकासकामांना आवश्यक जागा उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, रामकुंड पोलिस चौकी हटविल्यानंतर तेथे तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांसाठी बसण्याची कोणतीही व्यवस्था उरलेली नाही. परिणामी, तात्पुरत्या स्वरूपात कामकाजासाठी पर्यायी जागेचा शोध घ्यावा लागत असल्याची स्थिती आहे. चौकी हटविल्यानंतर सोमवारी परिसरातील दुकानांच्या आसपास बसून कामकाज करावे लागल्याची खंत काही पोलिस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
![]()

