Amazon

नाशिक शहरात विजयादशमीचा उत्साह; नाशिकमध्ये आज पाच ठिकाणी रावणदहन

नाशिक। दि. २० ऑक्टोबर २०२६: वाईट प्रवृत्तींवर चांगल्या प्रवृत्तींच्या विजयाचा संदेश देणारा विजयादशमी अर्थात दसरा सण आज शहरात उत्साहात साजरा होत आहे. सणानिमित्त नाशिकमध्ये विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सायंकाळी पाच प्रमुख ठिकाणी रावणदहन केले जाणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शहरातील विविध भागांत सघोष पथसंचलन आणि शस्त्रपूजनाचे कार्यक्रमही होणार आहेत.

हिंदू धर्मपरंपरेत विजयादशमीला विशेष महत्त्व आहे. प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून अधर्मावर धर्माचा विजय मिळवला, तर देवी दुर्गेने महिषासुराचा संहार केला. त्यामुळे देशभरात दसरा हा विजय, शौर्य आणि नव्या संकल्पांचा सण म्हणून साजरा केला जातो.

शहरात विविध भागांत संघाचे पथसंचलन:
विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पारंपरिक गणवेशात सघोष पथसंचलन आयोजित करण्यात आले आहे. इंदिरानगर, मखमलाबाद, नाशिकरोड, उपनगर, पवननगर, अंबड, जुने सिडको, पंचवटी, सावरकरनगर, टिळकनगर आणि सातपूर या भागांत सकाळी तसेच सायंकाळी संचलन होणार आहे. दरम्यान, राष्ट्रसेविका समितीच्या वतीने रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता कॉलेजरोड परिसरात सघोष पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: CSR निधीतून ४० गावांत विकासकामांचे आमिष; ४.२० लाखांची फसवणूक

झेंडूची फुले आणि आपट्याच्या पानांनी बाजारपेठ सजली:
दसऱ्याच्या पूजेसाठी झेंडूच्या फुलांना आणि आपट्याच्या पानांना विशेष महत्त्व असल्याने शहरातील बाजारपेठांमध्ये त्यांची विक्री वाढली आहे. गोदाघाट, रविवार कारंजा, अशोकस्तंभ, सिडको, उपनगर, इंदिरानगर आणि गंगापूर रोड परिसरात सोमवारी दुपारपासूनच विक्रेत्यांनी फुले आणि आपट्याच्या पानांची दुकाने मांडली होती. सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग पाहायला मिळत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' वाहतूक मार्गांत आज (दि. २०) महत्वाचे बदल...

गोदाघाटावर ५१ फुटांचा, तर गंगापूर रोडवर ६० फुटांचा रावण:
दसऱ्याच्या सायंकाळी गोदाघाट, गांधीनगर, गंगापूर रोड, काठे गल्ली आणि नाशिकरोड या प्रमुख ठिकाणी रावणदहनाचे कार्यक्रम होणार आहेत. गोदाघाटावर चतुःसंप्रदाय आखाड्याच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही रावणदहन केले जाणार असून, यासाठी ५१ फुटांचा रावणाचा प्रतीकात्मक पुतळा तयार करण्यात आला आहे.

गंगापूर रोडवरील शिवसत्य मैदानावर आमदार सीमा हिरे आणि योगेश हिरे यांच्या वतीने ६० फुटांच्या रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे. दुसरीकडे, सुमारे सात दशकांची रावणदहनाची परंपरा असलेल्या गांधीनगर मैदानावर यंदा ६५ फुटांचा पुतळा उभारण्यात येत आहे. या ठिकाणी रावणदहनापूर्वी रामायणातील विविध प्रसंगांचे सादरीकरण केले जाणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कारची काच फोडून २० लाखांची रोकड लंपास; अवघ्या काही मिनिटांत चोरट्यांनी बॅग पळवली

कालिका मंदिरात शस्त्रपूजन सोहळा:
विजयादशमीनिमित्त शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री कालिका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. मंदिरात सकाळी ११ वाजता शस्त्रपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला खासदार राजाभाऊ वाजे, सहायक पोलीस आयुक्त प्रमोद वाघ, मविप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा योगिता आहेर आणि अभिनेत्री अनिता दाते उपस्थित राहणार आहेत.

धार्मिक विधी, पथसंचलन, बाजारपेठांतील खरेदी आणि सायंकाळच्या रावणदहन कार्यक्रमांमुळे नाशिकमध्ये विजयादशमीचा उत्साह अनुभवायला मिळणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790