🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: उद्योग सुलभीकरणासाठी उद्योजकांचे अभिप्राय महत्वाचे- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

नाशिक। दि. १८ फेब्रुवारी २०२६: राज्य शासनाचे धोरण उद्योग स्नेही असून ते अधिक सुलभ करण्यासाठी उद्योजकांचे अभिप्राय महत्वाचे आहेत. या अभिप्रायांची नोंद घेत त्यांचा उद्योग धोरणात समावेश करण्यासाठी शिफारस करण्यात येईल. तसेच हे अभिप्राय राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन होण्यासाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वास विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी येथे व्यक्त केला.

राज्य शासनाच्या धोरणात्मक उपक्रमांतर्गत विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील व्यवसाय सुलभता परिसंस्था सुधारणे या विषयावरील धोरणात्मक आराखड्यावर चर्चा करण्यासाठी आणि औद्योगिक क्षेत्रातील आव्हाने समजून घेण्यासाठी हॉटेल ताज गेट-वे येथे भागधारक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योग विभागाच्या सहसंचालक वृषाली सोने, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक पाटील, जिल्हा उद्योग अधिकारी चेतन पाटील, बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक राजेश देशमुख केपीएमजीचे प्रीतम मोहन सिंग आदी उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक येथे 20 फेब्रुवारी रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले की, राज्य शासनाने इज ऑफ डुइंग बिझनेस धोरणांतर्गत उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात अधिकाधिक गुंतवणूक होण्यासाठी करावयाच्या उपाययोजना सुचविण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. प्रत्येक क्षेत्राच्या सूचना, अभिप्राय वेगवेगळे असू शकतात. या समितीला प्राप्त अभिप्राय उद्योग धोरणात समाविष्ट केले जातील. त्यामुळे उद्योग, व्यवसायांना सेवा देणे अधिक सुलभ होईल. त्यासाठी उद्योजकांच्या सूचना, अभिप्राय महत्वाचे आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आरटीओ चलनाचा बनावट मेसेज; अनोळखी लिंकवर क्लिक करताच ९ लाखांचा फटका

श्रीमती सोने म्हणाल्या की, राज्यात उद्योग, व्यवसाय वाढविण्यासाठी उद्योग विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. उद्योजकांना विविध सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होण्यासाठी मैत्री पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलवर कालबद्ध वेळेत सुविधा पुरविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

विभागीय व्यवस्थापक श्री. देशमुख, वरिष्ठ व्यवस्थापक ओंकार पठारे, गौरव पांडे यांनी उद्योजकांसाठी बँक ऑफ महाराष्ट्राच्या असलेल्या योजनांची माहिती दिली. ‘निमा’चे अध्यक्ष आशिष नहार, डॉ. साहेबराव झिरवाळ, रवी फालक, नितीन बंग, राजाराम सांगळे आदींनी विविध सूचना केल्या. यावेळी उद्योजकांच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी, नाशिक, अहिल्या नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790