महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ‘एनसीएफ’तर्फे नाशिककरांचा अपेक्षानामा सादर

नाशिक। दि. १४ जानेवारी २०२६: महानगरपालिकेच निवडून आल्यानंतर कुठली कामे करणार याबाबतची आश्वासने देणारे जाहिरनामे बहुतेक सर्वच पक्ष विविध नावांनी जनतेपुढे मांडत असताना ‘नाशिक सिटीझन्स फोरम’ अर्थात ‘एनसीएफ’ने विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी आणि विविध स्तरांतील नागरीकांशी चर्चा करून तसेच त्यांच्याकडून सुचना मागवून वाहतूक, पर्यटन, पर्यावरण, शिक्षण, आर्थिक विकास आदी विषयांवर ‘नाशिककरांचा अपेक्षानामा’ तयार केला आहे.

विविध प्रमुख राजकीय पक्षांकडेही हा अपेक्षानामा सादर करण्यात आला असून आगामी काळातील कामकाजात अपेक्षानाम्यातील मागण्या व सूचना अमलात याव्यात असाही प्रयत्न फोरमतर्फे करण्यात येणार आहे.

या अपेक्षानाम्यात वाहतूक क्षेत्रासंबंधी सूचना करताना म्हटले आहे की, गेल्या २० वर्षांत शहरातील एकही उड्डाणपूल शहरात झालेला नाही. सध्याच्या वाहतूकीचा ताण लक्षात घेता मायको सर्कल, एबीबी सर्कल, मुंबई नाका, सिटी सेंटर मॉल चौक, जुना गंगापूर नाका अशा ठिकाणी फ्लायओव्हर अथवा अंडरपासची उभारणी करावी. तसेच ओझर विमानतळ आणि नाशिकरोड रेल्वे स्थानक यांच्याशी नाशिक शहराची वाहतूक मेट्रोसारख्या सक्षम माध्यमांतून जोडली जावी.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: महिलेच्या खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेप

खासगी ट्रॅव्हल बसेससाठी मध्य शहरापासून बाहेर स्वतंत्र बसपोर्ट निर्माण करावे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने वाहतूक नियंत्रण आणि स्मार्ट सिग्नलींग, शहरात प्रमुख ठिकाणी मल्टीलेव्हल पार्किंगची निर्मिती करावी, अशाही अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या आहेत.

वाहतूकीला अडथळा ठरणारे आणि शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत फलकांवर कायमस्वरूपी बंदी आणणे आणि तीचा भंग करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करणे, नाशिकला भारताची इ-दूचाकी राजधानी बनवण्यासाठी प्रयत्न करावे, द्वारका ते नाशिकरोड रस्त्याचे आधुनिकरित्या रुंदीकरण करणे आणि नाशिकरोड येथील रेल्वेलाईनवरील उड्डाणपूलाचे रुंदीकरण करणे, अशाही सुचना या अपेक्षानाम्यात व्यक्त करण्यात आल्या आहेत.

🔎 हे वाचलं का?:  संत श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रा: भाविकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे प्रशासनाचे आवाहन

नाशिक आणि भोवतालच्या परिसरासाठी एक स्वतंत्र पर्यटन धोरण केले जावे, असे अपेक्षानाम्यात म्हटलेले असून होळकर पूल ते कन्नमवार पूल यादरम्यानच्या गोदापात्राचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करावा, रामकुंड किंवा तपोवन येथे साऊंड आणि लाईट शो सुरू करावा, नाशिकशी संबंधित पौराणिक कथांचे संग्रहालय व्हर्च्यूअल रिअलिटी तंत्रावर उभारले जावे, असे त्यात म्हटले आहे.

पर्यावरण क्षेत्राबाबत अपेक्षा व्यक्त करताना शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) सुधारण्यासाठी अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा वापर घटवत पर्यावरणपूरक इंधन उपलब्ध करून देणे, स्वच्छ भारत सर्वेक्षणात नाशिकला टॉप 5मध्ये आणण्यासाठी नियोजनबद्ध कृती कार्यक्रमाची आखणी करणे अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

शिक्षण क्षेत्राविषयी अपेक्षानाम्यात असे म्हटले आहे की, नविन राष्ट्रीय शिक्षण धोरणनुसार महापालिका शाळांतील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांच्या कौशल्य विकासासाठी अभियान राबवले जावे, प्रत्येक लोकप्रतिनिधींनी, सर्व नगरसेवकांनी आपापल्या विभागातील किमान दोन शाळा दत्तक घेत त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशील रहावे. शाळाबाह्य मुलांचे प्रमाण घटवावे, सायन्स सेंटर उभारावे आदी मागण्या मांडण्यात आल्या आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवन वृक्षतोडप्रकरणी उच्च न्यायालयात आज सुनावणी

सध्या दरडोई उत्पन्न वाढीच्या बाबतीत नाशिकचा देशातील महानगरांमध्ये १९ वा क्रमांक असून तो दहाच्या आत जाण्यासाठी रोजगारनिर्मिती, स्थानिक उद्योगांना चालना स्टार्टअप्ससाठी अनुकूल इकोसिस्टीम उभारणी या बाबी घडाव्यात असे अपेक्षानाम्यात म्हटले आहे. महिलांच्या सुरक्षिततेच्या राष्ट्रीय क्रमवारीत नाशिक सध्या टॉप ३१ शहरांमध्ये नाही. त्यामुळे सीसीटीव्ही आणि स्मार्ट पोलिसिंगच्या मदती महिलांसाठी सुरक्षित शहर असा नाशिकचा लौकीक बनवण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे अपेक्षानाम्यात म्हटले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790