नाशिक(प्रतिनिधी): कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. तरीदेखील नाशिकमध्ये नागरिक बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी करतांना दिसतात. तर दुसरीकडे नागरिकांकडून सुरक्षित अंतराचे पालन होत नाही, मास्कचा वापर होत नाही. यामुळे लोकांच्या या बेशिस्त वागण्यामुळे परत कोरोनाचा उद्रेक होतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे.तरी या परिस्थितीला आवर घालण्यासाठी नाशिक महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त त्या दिशेने पावले उचलत असून, यापुढे दुकानात पाच व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्तींना प्रवेशाची मुभा नाही.
त्याचप्रमाणे रविवार कारंजा, सीबीएस आणि इतर गर्दीच्या ठिकाणी देखील याच स्वरूपाचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शहराचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी यासंदर्भात आदेश झाले जारी केले आहेत. मागील महिन्यात महापालिकेने महासभेत कोरोनासंदर्भात चर्चा करताना पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई करण्याचे निर्देशित केले होते. त्यानुसार पोलिस आयुक्त पांडे यांनी जमावबंदी व इतर निर्बंध जारी केले आहेत. शहरातील दुकाने उघडण्याची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ७ ही असेल, तसेच दुकानदारांनी नियमांचे पालन करत दुकानात पाचपेक्षा अधिक ग्राहक नसतील याची काळजी घ्यावी. अन्यथा संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल.
यासंदर्भात महापालिकेचे विभागीय अधिकारी तसेच प्रभारी स्टेशन इन्चार्ज यांना दररोज कारवाई करून तसा अहवाल सादर करावा लागणार आहे. सदर जमावबंदी निर्बंधांनुसार प्रतिबंधित क्षेत्रातील नियम हे कायम असतील. त्याचप्रमाणे गर्दी जमा होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी कायम राहील, विवाहासाठी जास्तीत जास्त पाच नागरिकांना परवानगी असेल, अंत्यविधीसाठी केवळ वीस जणांना परवानगी असेल, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे ,धूम्रपान इत्यादीवर बंदी आहे. तसेच गर्भवती महिला , पाच वर्षाच्या आतील बालके व ज्येष्ठ नागरिकांवर बाहेर पडण्यास निर्बंध आहेत.
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, मास्क न लावणे, सुरक्षित अंतर न ठेवणे या बाबी ज्याठिकाणी आढळून आल्या त्या ठिकाणी नियुक्त अधिकारी किंवा कर्मचारी त्या संदर्भात कारवाई करू शकतील. त्यांनी काढलेल्या मोबाईलमधील फोटोंचा वापर पुरावा म्हणून सादर करता येऊ शकतो, ते ग्राह्य धरण्यात येईल असे आयुक्तांनी सांगितले. नियमांचे भंग करणाऱ्या व्यक्तीला आता पोलीस ठाण्यात सुपूर्त करता येईल.तसेच थेट न्यायालयासमोर देखील उभे राहावे लागणार आहे. नियमभंग करणाऱ्याला दंड झालाच तर संबंधित कर्मचारी ज्यांनी मोबाईल फोटोचा पुरावा सादर केला असेल, त्यांना शंभर रुपयाचे बक्षीसही देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी जाहीर केले आहे.