नाशिक (प्रतिनिधी): कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या निकषांचे पालन करूनच प्रशासन निर्णय घेईल; मात्र काही व्यापारी संघटनांनी स्वयंस्फूर्तीने घेतलेल्या सकारात्मक निर्णयाचे स्वागत असेल असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
नाशिक मधील विविध व्यापारी संघटनांनी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, मनपा अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर, मनपा उपायुक्त मनोज घोडे पाटील, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार जयंत जाधव, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, किराणा घाऊक व किरकोळ व्यापार संघटना अध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांसह विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी जिल्ह्यातील विविध व्यापारी संघटनांच्या मागण्या यावेळी मांडल्या. यामध्ये दुकानांची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ अशी मर्यादित करणे आणि सध्या दुकानांसाठी सुरु असलेली सम विषम प्रणाली बंद करून सरसकट दुकाने उघडे ठेवण्याची परवानगी मिळावी आदी प्रमुख मागण्यांचा समावेश होता.
याबाबत .भुजबळ म्हणाले, केंद्र शासन आणि राज्य शासनाने जे निकष ठरवून दिलेले आहेत; त्यांचे तंतोतंत पालन करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे; दुग्ध व्यवसाय, किराणा माल आणि मेडिकल आदी गोष्टी मध्ये अडथळा होता कामा नये तसेच जबरदस्तीने दुकाने बंद करायला लावणाऱ्यांविरोधात पोलीस कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोनासोबत आपल्याला अर्थचक्राचाही विचार करावा लागणार आहे. जे रोजंदारीवर जगतात त्यांच्या उदरनिरवाहाचा विचार करावा लागेल. तसेच सध्या दुकानांसाठी सुरु असलेली सम विषम प्रणालीबाबत निर्णय घेताना मुख्य सचिवांशी चर्चा केली असता ही पद्धती पूर्ण अभ्यासांती तयार करण्यात आली असून ज्याठिकाणी या पद्धती पासून सुट देण्यात आली तेथे रुग्णांची संख्या वाढली असल्याचे मुख्य सचिव यांनी नमूद केले त्यामुळे तूर्त या पद्धतीचे पालन करणे अनिवार्य असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
रोज जास्त प्रमाणात स्वाब घेऊन आपण टेस्ट करत आहोत त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढते आहे; मात्र त्याच वेळी ज्या ठिकाणी बाधित आढळत आहे तो परिसर आपण १४ दिवस प्रतिबंधित करत आहोत. जास्त चाचण्या करून आपण रुग्ण शोधत आहोत त्यामुळे संख्या वाढत आहे. परिणामी जे संसर्ग वाहक आहेत त्यांवर आळा बसत आहे. असेही, त्यांनी सांगितले.
जबरदस्तीने दुकाने बंद करणाऱ्यां विरुध्द कारवाई
नाशिक शहरातील काही भागात नेते मंडळी जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास भाग पाडत असल्याची तक्रार व्यापारी संघटनांनी बैठकीत केली आहे, त्यामुळे दुकाने जबरदस्तीने बंद करण्यास भाग पाडणाऱ्या व्यक्तींवर पोलीस प्रशासन कडक कारवाई करणार असल्याचे पालकमंत्री . भुजबळ यांनी सांगितले. तसेच ज्या व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडणाऱ्या व्यक्तींची तात्काळ तक्रार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केली.
सोशल डिस्टन्सिंगचे नियमांचे पालन करुन व्यापार करावा
व्यापाऱ्यांनी मास्क लावणाऱ्या ग्राहकालाच दुकानात प्रवेश द्यावा. येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सुरक्षित अंतरावरचं उभे करुन वस्तूंची देवाण घेवाण करावी. तसेच दुकानात येणाऱ्या प्रत्येकाला सॅनिटायझर्स उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी व्यापाराची असेल,अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
बैठकीत व्यापाऱ्यांच्या प्रत्येक शंकाचे निरसन करुन त्यावर काय उपाययोजना करण्यात येतील यावर पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, मनपा अतिरिक्त आयुक्त प्रविणअष्टीकर यांनी व्यापाऱ्यांसोबत चर्चा केली.