नाशिक (प्रतिनिधी): गोदाघाट परिसरातील गांधी तलावाच्या किनारी लावलेल्या चार बोटी ज्वलनशील पदार्थ टाकून जाळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. यात बोटी पूर्णतः जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
गोदाघाट परिसरातील गांधी तलावातील बोटिंगचे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसह नागरिकांना विशेष आकर्षण असते. मात्र, स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या वतीने करण्यात येणाऱ्या कामामुळे गोदावरी नदीपात्राचा प्रवाह थांबविण्यात आल्याने गांधी तलाव पूर्णतः कोरडा झाला आहे.
परिणामी या ठिकाणच्या बोटी तलावाच्या किनारी लावण्यात आलेल्या होत्या. यामुळे येथील बोटिंग व्यवसाय पुन्हा बंद झाला. अशी परिस्थिती असताना बुधवारी (दि. २४) पहाटेच्या सुमारास गांधी तलावकिनारी उभ्या असलेल्या या चार बोटींची अज्ञाताकडून जाळपोळ करण्यात आल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सकाळी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. दरम्यान, वर्चस्ववादातून हा प्रकार घडल्याची चर्चा सुरू आहे