नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): भक्त परिवारातून ओळख झालेल्या सोलापूरच्या संशयितांनी नाशिकच्या महिलेस सोनारांच्या भिशीत गुंतवणूकीस भाग पाडून गंडा घातला. त्याचप्रमाणे, सोन्याच्या दागिन्यांचा अपहार आणि महिलेच्या नावावरील फ्लॅटच्या कागदपत्रांवर बनावट स्वाक्षरी करून कर्ज काढले. अशारितीने संशयितांनी सुमारे ७६ लाखांना गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत रवींद्र पोतदार (रा. अंदूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद), रेणुका रवींद्र पोतदार, रवींद्र पोतदार अशी संशयितांची नावे आहेत. नाशिकच्या रुपाली नामक महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, २०१७ मध्ये त्यांची ओळख या संशयित प्रशांत पोतदार यांच्याशी झाली होती. त्याच ओळखीतून संशयितांनी रुपाली यांना सोलापूरमध्ये त्यांच्या सोनारांची भिशीमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यातून चांगला आर्थिक परतावा मिळू शकतो असेही आमिष दाखविले होते. त्यामुळे रुपाली यांनी मोठी आर्थिक गुंतवणूक केली.
परंतु संशयितांनी ठरल्यप्रमाणे, त्यांना कोणताही मोबदला दिला नाही, व भिशीची रक्कमही दिली नाही. तसेच, पोतदार यांच्यावर विश्वास ठेवून रुपाली यांनी त्यांच्याकडील सोन्याचे दागिने शुद्ध करण्यासाठी दिले होते. परंतु संशयितांनी ते दागिनेही परत न करता त्या दागिन्यांचे अपहार केला. त्याचप्रमाणे, रुपाली यांच्या नाशिकमधील फ्लॅटवरील कागदपत्रांवर बनावट स्वाक्षरी करून त्यावर कर्ज काढले.
सदरची रक्कम वापरून घेत ती परत न करता फसवणूक केली. अशा तिन्ही प्रकारात संशयिताने त्यांची ७६ लाख ४७ हजार ६२० रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात संशयितां विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे हे करीत आहेत.