नाशिक। दि. १३ जानेवारी २०२६: महानगरपालिका निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून, मतदानापासून मतमोजणीपर्यंतची प्रक्रिया शांततापूर्ण व निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत.
त्याच अनुषंगाने १४ जानेवारीच्या सकाळपासून १६ जानेवारीला मतमोजणी पूर्ण होईपर्यंत दारू विक्रीवर संपूर्ण बंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत शहरातील सर्व दारू दुकाने, बार व परमिट रूम बंद राहणार आहेत.
राज्यातील सर्वच राजकीय पक्षांसाठी पुढील तीन दिवस अत्यंत निर्णायक मानले जात असून, उमेदवारांकडून जोरदार तयारी सुरू आहे. महापालिका निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात मद्य आणि पैशांचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेता, अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक काळात मद्यपानामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासन विशेष सतर्क आहे.
महानगरपालिका क्षेत्रात मतदानाच्या आधीचे दोन दिवस आणि मतदानानंतरची मतमोजणी पूर्ण होईपर्यंतचा कालावधी ‘ड्राय डे’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. या काळात सार्वजनिक ठिकाणी मद्यपानासही सक्त मनाई करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
१५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता, शांतता आणि सुरक्षितता अबाधित राहावी, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
![]()


