नाशिक (प्रतिनिधी): फेडेक्स कस्टमर केअरचा सिनिअर एक्झिक्युटीव्ह असल्याची बतावणी करुन कुरिअरमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगत ११ लाखाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
या बतावणी करणा-या भामट्याने प्रकरण मिटविण्याच्या मोबदल्यात बँक खात्यात पैसे भरण्यात भाग पाडले. पण, कालांतराने ही फसवणुक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने पोलीसात धाव घेतली आहे. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदिरानगर भागातील चार्वाक चौकात राहणा-या ३१ वर्षीय व्यावसायीकाने याबाबत फिर्याद दिली आहे. तक्रारदाराने गेल्या मार्च महिन्यात काही माल मागविला होता. या मालाचे पार्सल मिळण्यापूर्वीच भामट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. एका मोबाईल क्रमांकावरून फेडेक्स कस्टमर केअरचा सिनिअर एक्झिक्युटीव्ह असल्याची बतावणी करीत तुमच्या कुरिअरमध्ये ड्रग्ज आढळून आल्याचे सांगून तक्रारदारास धमकावले. यानंतर भामट्याने प्रकरण मिटविण्याच्या मोबदल्यात काही रक्कमेची मागणी केली.
त्यानुसार तक्रारदाराने १० लाख ४५ हजार २८१ रूपये संशयिताने सांगितलेल्या स्टेट बँकेच्या खात्यात भरल्याने ही फसवणुक झाली. कालांतराने आपली फसवणुक झाल्याचे निदर्शनास येताच तक्रारदाराने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक शेख करीत आहेत. (फिर्यादीच्या विनंतीवरून त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.)