नाशिक (प्रतिनिधी): अपर सर्किट स्टॉक ट्रेडिंग करून देतो, असे सांगून एका दाम्पत्याने एका इसमाला दोन लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याची घटना सिडकोत घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी राजेंद्र शांताराम शिरसाठ (रा. छत्रपतीनगर, नवीन सिडको, नाशिक) यांना दि. २ ते १३ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत आरोपी पंकज गुप्ता व निशा गुप्ता (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांनी फेसबुकद्वारे संपर्क साधला.
त्यानंतर फेसबुकवर ऑनलाईन स्टॉक ट्रेडिंग ॲप बेन कॅपिटल नावे फेसबुकवरून एक लिंक पाठविली होती. त्याद्वारे बेन स्टॉक ट्रेडिंग अकाऊंट ओपन करून स्टॉक ट्रेडिंग चालू केले. त्याद्वारे फिर्यादी शिरसाठ यांना आरोपी यांनी रोज अपर सर्किट स्टॉक देतो, असे सांगितले.
त्यानंतर आरोपींनी शिरसाठ यांच्या स्टेट बँक व आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून एकूण २ लाख १०० रुपये परस्पर काढून घेत फसवणूक केली. हा प्रकार ऑनलाईन अॅपद्वारे घडला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात बंटी-बबलीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाडवी करीत आहेत. (अंबड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ६८३/२०२४)