नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शेअर मार्केटच्या नावाने नागरिकांना दीर्घकालीन गुंतवणूक करायला भाग पाडून सायबर चोरट्यांनी ७८ लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर दुसऱ्या व्यक्तीलाही सात लाखांना लुटल्याची नोंद सायबर पोलिस ठाण्यात झाली आहे. चोरट्याचे व्हॉट्सॲप व इन्स्टाग्राम प्रोफाईलच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.
शेअर मार्केटमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो, असे आमिष दाखवून नाशिकमधील विविध व्यक्तींना आतापर्यंत १५ कोटींपेक्षा अधिकचा गंडा सायबर चोरट्यांनी घातला आहे. आताही तशाच स्वरूपाची घटना शहरात घडली. शहरातील दोन व्यक्तींना सायबर भामट्यांनी १५ सप्टेंबर २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत व्हॉटसअप क्रमांक ९५८७११२४४३ व ८०९७४३६८४९ आणि इन्स्टाग्राम प्रोफाईलवरून संपर्क साधला.
आम्ही शेअर मार्केटमधील अधिकृत कंपनीचे ब्रोकर असल्याची बतावणी त्यांनी केली. गुंतवणूक करायचीच आहे आणि आर्थिक फायदाच हवा असेल तर आमच्याकडे ट्रेडिंग, स्टॉक टू आयपीओ घ्या, असे आमिष दाखविले. दरम्यान, स्टॉक डिटेक्शन ग्रुप अशा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये दोघांनाही समाविष्ट होण्यास भाग पाडत अप्पर सर्कीटच्या स्टॉकबद्दल वेळोवेळी माहिती दिली.
‘कर्मा कॅपिटल ट्रेडिंग आणि व्हाइट वे’ अशा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर खाते ओपन करण्यास सांगितले. या अॅपवर विविध कंपन्यांचे स्टॉक तसेच आयपीओ घेण्यासाठी दिलेल्या विविध बँकेच्या खात्यांवर तक्रारदारास ७१ लाख रुपये आणि दुसऱ्या तक्रारदारास सात लाख १५ हजार असे एकूण ७८ लाख ७८ हजार रुपये भरण्यास भाग पाडून आर्थिक फसवणूक केली. वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख पुढील तपास करत आहेत.