नाशिक: शेअर ट्रेडिंग करणे पडले महागात; सायबर भामट्यांनी घातला 71 लाखांना गंडा

नाशिक (प्रतिनिधी): सायबर भामट्यांनी केलेल्या शेअर मार्केट ट्रेडिंगच्या फसव्या जाहिरातीला भुलून उच्च शिक्षित चौघांची ७१ लाखांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी  शहर सायबर पोलिसात अज्ञात सायबर भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील व्यवसायाने डॉक्टर असलेल्या फिर्यादीला गेल्या जुलै महिन्यात सोशल मीडियावर शेअर मार्केट ट्रेडिंगसंदर्भातील एक जाहिरात दिसली.

🔎 हे वाचलं का?:  राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरण; काही भागांत हलक्या पावसाची शक्यता

त्यावर, शेअर मार्केटमध्ये आर्थिक गुंतवणूक केल्यास त्यावर जादा परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. त्या आमिषाची भुरळ डॉक्टरला पडली. त्यानुसार त्यांनी जाहिरातीतील संपर्क क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर त्यांना सायबर भामट्याने व्हॉटसॲपवरून संपर्क साधून विश्वास संपादन केला. त्यांना शेअर मार्केट ट्रेडिंग टास्कच्या नावाखाली एका संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करण्यास भाग पाडले

तसेच आरइएक्स नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास लावून त्याद्वारे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग केले जात असल्याचे भासविले. सायबर भामट्यांनी सांगितल्याप्रमाणे विविध बँक व वॉलेट खात्यावर डॉक्टरने २८ लाख ८० हजार ७० रुपये वर्ग करीत गुंतवणूक केली. त्या बनावट ॲपवर त्यांनी केलेल्या गुंतवणूकीवर जादा परतावा मिळत असल्याचे दिसून येत होते. परंतु सदरची रक्कम त्यांच्या बँक खात्यात वर्ग होत नसल्याने त्यांनी सायबर भामट्याकडे विचारणा केली असता, सुरुवातीला टाळाटाळ करणारे संशयित नंतर संपर्काबाहेर गेले.

🔎 हे वाचलं का?:  राष्ट्रीय मतदार दिवस: राज्यस्तरीय कार्यक्रमानिमित्त नाशिकला आज (दि. २५) विविध कार्यक्रम

याच पद्‌धतीने शहरातील आणखी दोन सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि एक सेवानिवृत्त झालेली व्यक्तीही अशाच आमिषाला भुलले आणि त्यांनीही आर्थिक गुंतवणूक केली. परंतु त्यांचीही फसगत झाली. अशारितीने पाचही जणांची सायबर भामट्यांनी तब्बल ७१ लाख १११ रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी शहर सायबर पोलिसात अज्ञात संशयितांविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख हे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790